योगेश मारणे
न्हावरे (पुणे) : आमदार अशोक पवार यांनी जाणीव पूर्वक घोडगंगा साखर कारखाना बंद पाडला. त्यामुळे आगामी काळात कारखान्याच्या सभासदांनी अधिक जागृत होऊन कारखाना सुरू होईपर्यंत अशोक पवार यांना गावा-गावांमध्ये प्रवेश बंदी केली पाहिजे. असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व पुणे जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद यांनी केले. न्हावरे (ता. शिरूर) येथे सर्वपक्षीय घोडगंगा किसान क्रांती मोर्चाच्या पद यात्रेची आज ( दि.०२) बुधवारी ११ व्या दिवशी सांगता सभा पार पडली. त्यावेळी प्रदीप कंद बोलत होते.
पुढे कंद म्हणाले की,अशोक पवार हे राजकारणात सर्वसामान्य जनतेचे लक्ष विचलित करण्यात कायमच यशस्वी झाले आहेत. तसेच त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी आणि व्यंकटेश खाजगी कारखाना नावारूपाला आणण्यासाठी शेतकऱ्यांचा घोडगंगा कारखाना बंद पाडला. संपूर्ण राज्यात घोडगंगा साखर कारखान्या इतकी भौगोलिक परिस्थिती कोणत्याही साखर कारखान्याची अनुकूल नाही. घोडगंगाची भौगोलिक परिस्थिती अनुकूल असतानाही घोडगंगा कारखाना कर्जबाजारी होऊन बंद पडतोच कसा? असाही प्रश्न कंद यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच आपण खूप निष्ठावान असल्याचे ढोंग अशोक पवार आणत आहेत. असाही टोला कंद यांनी लगावला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार अशोक पवार यांचे खूप राजकीय लाड केले. त्यामुळेच अशोक पवार हे जनतेला वेठीस धरून स्वार्थी राजकारण करत आहेत. सर्वसामान्य शेतकरी सभासदांनी कारखाना जो पर्यंत सुरू होत नाही, तोपर्यंत आमदार पवार यांना तालुक्यात कोठेही फिरू देऊ नये. असे प्रदीप कंद यांनी शेवटी सांगितले. दरम्यान घोडगंगा कारखान्याचे माजी उपाध्यक्ष दादा पाटील फराटे यांनी आक्रमकपणे बोलताना कारखान्याची परिस्थिती मांडली व अशोक पवार यांना उद्देशून दादा पाटील फराटे म्हणाले की, तुमच्या खाजगी व्यंकटेश कारखान्याचा अभ्यास करता मग शेतकऱ्यांच्या घोडगंगा कारखान्याच्या अभ्यासाची पुस्तके फाटली काय? असा उपरोधित प्रश्न उपस्थित केला.
याप्रसंगी घोडगंगाचे माजी व्हा. चेअरमन बाबासाहेब फराटे, राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस राजेंद्र कोरेकर, शिरूर तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष रवींद्र काळे, शिवसेनेचे तालुका प्रमुख रामभाऊ सासवडे, माजी सभापती शशिकांत दसगुडे, माजी जि.प.सदस्य शांताराम कटके, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य राहुल पाचर्णे, काँग्रेसचे महेश ढमढेरे, घोडगंगाचे माजी संचालक सुधीर फराटे, सरपंच कमल कोकडे, भाजपचे सुभाष कांडगे, सागर खंडागळे, बिरदेव शेंडगे यांची भाषणे झाली.
यावेळी शिरूर भाजपचे अध्यक्ष आबासाहेब सोनवणे, गौतम कदम,जयेश शिंदे,श्रीनिवास घाटगे, भगवान शेळके,राहुल गवारे,पुणे जिल्हा दूध संघाचे संचालक स्वप्नील ढमढेरे, निखिल तांबे, सरपंच दिपाली नागवडे, कैलास सोनवणे, राजेंद्र गदादे, एकनाथ शेलार, सचिन पलांडे, कुंडलिक शितोळे, माजी उपसरपंच अरुण तांबे, शरद साठे इत्यादी मान्यवर, कारखान्याचे सभासद व शेतकरी उपस्थित होते.
अशोक पवार यांच्या खाजगी व्यंकटेश कारखान्याचे भूमिपूजनच घोडगंगा कारखाना रसातळाला घेऊन जाण्यास कारणीभूत ठरले आहे. ४५ कोटींचा भ्रष्टाचार कारखान्याच्या सहवीज निर्मिती प्रकल्पामध्ये आमदार अशोक पवार यांनी केला आहे.
श्री.बाबासाहेब फराटे (माजी उपाध्यक्ष घोडगंगा साखर कारखाना)