पुणे : जीवनात काही माणस अनोखी असतात. त्यांनी एखाद्या कार्याचा ध्यास घेतला की तो शेवटाला नेत असतात. त्यामध्ये कोणतीही अडचण, समस्या उभी राहीली तरी पाठिचा कणा ताठ करत ‘ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे’ म्हणत ध्येयाकडे लक्ष केंद्रित करतात. अशाच एका नारीशक्तीचा प्रवास आपण बघणार आहोत. पोंदेवाडी (ता.आंबेगाव) येथील भाग्यश्री अंकूश पोखरकर हिने पोलिस दलात भरती होण्याची इच्छा मनी बाळगली होती. कुटूंबाचा आग्रह म्हणून लग्न झाल्यावर देखील वैवाहिक जीवनाबरोबर शेती व्यवसाय संभाळून पतीसोबत पोलिस भरतीसाठी सराव केला. अखेर तिच्या प्रबळ इच्छा, जिद्द चिकाटीच्या जोरावर ती पतीसोबत पोलिस दलात भरती होऊन प्रशिक्षण पुर्ण करत मुंबईसारख्या ठिकाणी पोलिस म्हणून कार्यरत होणारी रणरागीनी ठरली आहे.
आंबेगाव तालुक्यातील पोंदेवाडी येथील अंकूश पोखरकर यांच्या गरीब शेतकरी कुटंबात भाग्यश्रीचा जन्म झाला. चार बहिन व एक भाऊ असा परिवार असून आई वडील पारंपारीक शेती व्यवसाय करत होते. भाग्यश्री ही कुटूंबात सगळ्यात लहान होती. तिचे प्राथमिक शिक्षण हे छोट्याशा वाडीतल्या शाळेत झाले. तेव्हापासून पोलिस वर्दीचे आकर्षण तिला होते. शिक्षण घेऊन पोलिस दलात जाण्याचा तिचा मानस होता. कुटूंब मोठे तसेच गरिब असल्याने तिला तिची इच्छा कोणाला सांगता येत नव्हती.
भाग्यश्रीला शेतीमध्ये काम करून शिक्षणाचे धडे गिरवावे लागले आहेत. २०२० मध्ये भाग्यश्रीचा विवाह चांडोह (ता. शिरूर) येथील तुषार शेलार यांच्याशी झाला. हे कुटंबू देखील शेतकरी वारसा असलेले कुटूंब होते. लग्न झाल्यावर भाग्यश्रीने तुषारला पोलिस दलात जाण्याची इच्छा व्यक्त केली. तुषारने देखील वैवाहिक जीवनापेक्षा जीवनसंगीनीची साथ देण्याचे ठरविले. दोघांनी घरचा शेती व्यवसाय संभाळत जांबूत (ता. शिरूर) येथील पोलिस प्रशिक्षिण केंद्रात जाऊन सराव सुरू केला.
या काळात या दोंघाना देखील अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. पण आई वडीलांसारखे सासु सासऱ्यांनी भाग्यश्री आणि तुषार यांना पाठबळ दिले. त्यातून पती सोबत पोलिस भरतीसाठी धावण्याचा सराव सुरू झाला. समाजातून त्यांना या बाबत अनेकदा अवेहलना सहन कराव्या लागल्या. त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. सराव सुरू ठेवत अखेर २०२३ ला भाग्यश्री आणि तुषार दोघेही एकाच वेळी पोलिस दलात भरती झाले. तिचे ध्येय तिने पुर्ण केले होते.
भाग्यश्री व तुषार यांनी पोलिस दलाचे ९ महिने प्रशिक्षण पुर्ण केले. त्यानंतर नवी मुंबई येथील मुख्यालयात ते कार्यरत झाले आहे. आयुष्यात काही ध्येय निश्चित करायचे असेल तर त्यासाठी त्यागाची गरज असते. नविन विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर शाररीक सरावात नियमितता ठेवली की ध्य़ेय गाठायला सोपे जाते. माझ्या आई-वडील, सासु-सासरे तसेच पतीच्या साथीमुळे हे ध्येय मी गाठू शकले. असे भाग्यश्रीने सांगितले.