पुणे : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिरूरमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला आहे. पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि खेड-आळंदी विधानसभेचे निवडणूक प्रमुख अतुल देशमुख यांनी भाजपला रामराम ठोकला आहे. अतुल देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघात मोठी खळबळ उडाली आहे.
अतुल देशमुख यांनी भाजपला सोड चिट्ठी दिल्याने शिरुर लोकसभा मतदारसंघात महायुतीला हा मोठा फटका मानला जात आहे. अतुल देशमुख यांनी 2019 ची विधानसभा निवडणूक लढवली होती. ते सध्या अजित पवारांसोबत असलेल्या खेड-आळंदीचे आमदार दिलीप मोहिते यांच्याकडून थोड्या मतांनी पराभूत झाले होते. मात्र, दिलीप मोहिते अजित पवारांसोबत महायुतीत सहभागी झाल्याने अतुल देशमुख नाराज झाले होते.
काय म्हणाले अतुल देशमुख
मागील अडीच वर्षात स्वाभिमानाला ठेच लागली. समन्वयही साधता आला नाही. मागील एक दीड वर्षात हीन वागणूक मिळाल्याने थांबण्याचा निर्णय घेतला आहे. काय करायचं हा निर्णय घ्या असं सांगितलं, स्वाभिमानाने लढायचं, पवारांमागे उभ राहायचं. आज आम्ही पवार साहेबांच्या नेतृत्वात पक्षात प्रवेश करायचं ठरवलं आहे, असं अतुल देशमुख यावेळी म्हणाले.
दरम्यान, अतुल देशमुख उत्तर पुणे जिल्ह्यात भाजपचे मोठं नाव आहे. लोकसभेच्या महायुतीच्या जाहीर मेळाव्यात त्यांनी दांडी मारल्याने चर्चा रंगली होती. ज्या पक्षात काम करतो तेच आपला विचार करत नसल्याची खंत देशमुखांनी व्यक्त केली.
अतुल देशमुख यांचे तालुक्याच्या पश्चिम भागातील जिल्हा परिषद गटावरच नाही तर त्या भागासह तालुक्यावरही चांगले प्रभुत्व आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष म्हणूनही त्यांनी प्रभावी काम पाहिलं आहे. गतवेळची आमदारकीची निवडणूक अपक्ष लढवित त्यांनी ५५ हजार मते घेतली होती. त्यांना मानणारे तरुण कार्यकर्ते गावागावात आहेत. त्यांच्यासह त्यांनी भाजप सोडल्याने त्याचा पहिला फटका पक्षाला या लोकसभा निवडणुकीतच बसणार असल्याच्या जोर धरू लागल्या आहेत.