राहुलकुमार अवचट / यवत : अनेकवेळा तक्रारदार माघार घेत असल्याने केलेली मेहनत वाया जाते, असे प्रतिपादन लाचलुचपत विभागाचे पोलिस निरीक्षक विरनाथ माने यांनी केले. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व अखिल भारतीय ग्राहक पंचायत दौंड तालुका व शहर यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक बांधकाम विभाग दौंड येथील शासकीय विश्रामगृहात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याबाबत कार्यशाळा संपन्न झाली.
यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथील पोलिस निरीक्षक विरनाथ माने यांनी लाच देणे व घेणे हा कायद्याने गुन्हा असल्याचे सांगितले. नागरिक शासकीय लोकसेवक क्लास १ ते ४ पर्यंतच्या सर्व कर्मचारी वर्गावरती लाच घेताना रंगेहाथ पकडले, तर गुन्हा दाखल होऊन शिक्षा होऊ शकते. काहीवेळा तक्रारदार माघार घेतात तर काही वेळा पंच फुटतात अशा वेळी लाचलुचपत विभागाने घेतलेली मेहनत वाया जाते. काही वेळा नागरिक तक्रार करताना खुणशी, पुर्वीचे वाद असल्याकारणाने तक्रार दाखल करतो.
यामुळे काही वेळेस अडचण निर्माण होते, तरी असल्या प्रकारच्या तक्रारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आणू नका अशी विनंती केली. दौंड येथे अनेकवेळा सापळा लावले व सगळे पुर्णत्वास नेले आहे. शासकीय सेवेतील उच्च अधिकारी गळाला लागले पाहिजे म्हणजे छोटे मोठे कर्मचारी सरळ मार्गी चालतात, असे विरनाथ माने यांनी यावेळी सांगितले.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत दौंड शहर अध्यक्ष गणेश जगताप, रमेश लडकत, दादासाहेब जाधव, अरुण खताळ यांसह अनेक नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक बाबतीत अनेक प्रश्न उपस्थित केले. यासर्व प्रश्नांची पोलीस निरीक्षक माने यांनी येथोचित्त उत्तरे दिली. कार्यशाळेपूर्वी दौंड पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, पोलीस उपनिरीक्षक तुकाराम राठोड, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी माने, दौंड शहर अध्यक्ष गणेश जगताप, कैलास कदम अजित मापारे यांसह ग्राहक पंचायतीच्या सदस्यांनी पोलिस ठाण्यातील माहिती घेतली. कार्यशाळेच्या शेवटी ग्राहक पंचायतीच्या वतीने पोलीस निरीक्षक विरनाथ माने यांना ग्राहक बिंदू (ज्ञानाचे भांडार) असणारी स्मरणीका व अखिल भारतीय ग्राहक पंचायतची डायरी भेट देऊन दौंड तालुका व शहर यांच्या वतीने आभार मानण्यात आले.
या कार्यशाळेसाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत दौंड तालुका अध्यक्ष प्रमोद शितोळे, शहर अध्यक्ष गणेश जगताप, तालुका उपाध्यक्ष राजेंद्र शेलार, सचिव नितीन थोरात, कोषाध्यक्ष दादासाहेबजाधव, सर्व विषय समिती प्रमुख व असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.