योगेश शेंडगे
शिक्रापूर, (पुणे) : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात अरणगाव परिसरात ठोंबरेवस्ती येथे काही अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकत एका वृद्ध महिलेची हत्या केल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. रविवारी 17 मार्च रोजी मध्यरात्री शिरूर तालुक्यातील ठोंबरेवस्ती येथे दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकत वृद्ध दाम्पत्याला मारहाण केली. या मारहाणीत वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. तर वृद्ध व्यक्ति गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
फुलाबाई आनंदा ठोंबरे (वय ६५) असं मृत्यू झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. तर आनंदा सावळेराम ठोंबरे (वय ७०) असं जखमी वृद्धाचे नाव आहे. दोघेही ठोंबरेवस्ती, शिरूर यथील रहिवाशी आहेत. याप्रकरणी आनंदा यांचा मुलगा बाबा ठोंबरे याने पोलिसांत तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंदा ठोंबरे आणि त्यांची पत्नी फुलाबाई ठोंबरे हे दोघे ठोंबरेवस्ती येथे राहतात. रविवारी रात्री ते त्यांची कामे आटोपून झोपले होते. मध्यरात्री ३ च्या सुमारास काही दरोडेखोर ठोंबरे दाम्पत्यांच्या घरात घुसले. दरम्यान, आवाज झाल्याने ठोंबरे दाम्पत्य जागे झाले. यावेळी दरोडेखोरांनी त्यांना जबर मारहाण केली.
तसेच घरातील दागिने आणि रोख रक्कम घेऊन ते पसार झाले. या घटनेत फुलाबाई या गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर आनंदा ठोंबरे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांचावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पंचनामा केला आहे. दरोडेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी तपास पथके तयार केली असून सिसिटीव्ही आणि श्वान पथकाच्या साह्याने त्यांचा माग काढण्याचे काम सुरू आहे.