दौंड : कुरकुंभ औद्योगिक (एमआयडीसी) वसाहतीला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी पाटस कारखाना रस्त्यावर राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक परिसरात फुटली. आज रविवारी (दि. १२) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले असून रस्त्याला तळ्याचं स्वरूप आलं आहे.
पाटस येथील राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक परिसरात वरवंड येथील व्हिक्टोरिया तलावातून कुरकुंभ औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी अचानक फुटली. यामुळे पाण्याचा उंच फवारा हवेत उडाला, लाखो लिटर पाण्याची नासाडी झाली. पाण्याचा फवारा उडाल्याने रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले होते. तसेच रस्त्यावरील दुकानात पाणी शिरले, काही वेळातच या जलवाहिनीतून लाखो लिटर पाणी वाया गेले. मागील काही महिन्यापासून वरवंड येथील व्हिक्टोरिया तलावातील पाणी साठा संपुष्टात आल्याने हा तलाव कोरडा पडला होता.
काही दिवसापूर्वी वरवंड ग्रामपंचायत प्रशासनाने खडकवासला कालव्याचे दरवाजे तोडून व्हिक्टोरिया तलावात पाणी सोडले होते. ८-१० दिवसांपूर्वी हा तलाव पाण्याने भरला आहे. त्यामुळे या तलावातुन कुरकुभ एमआयडीसीला पाणीपुरवठा सुरू केला आहे. मागील तीन महिन्यापासून दौंड तालुक्यात पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. ऐन उन्हाळ्यात नागरिकांना पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी उपलब्ध नव्हते. मात्र, ऐन उन्हाळ्यात जललवाहिनी फुटुन लाखो लिटर पाणी वाया गेले आहे.