पुणे : सोशल मीडियावर रिल्स बनवून लोकप्रिय झालेला 26 वर्षीय तरुण सायबर गुन्हेगारांच्या टोळीत सहभागी असल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे. पुणे सायबर पोलिसांनी रोहन रामेश्वर जाधव याला पिंपळे गुरव परिसरातून अटक केली आहे. विशेष म्हणजे, या टोळीने एका 82 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल 10 कोटी 74 लाख 65 हजार रुपयांची फसवणूक केली आहे.

या प्रकरणाच्या तपासात सायबर फसवणुकीचे मोठे जाळे उघड झाले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, टोळीशी संबंधित तब्बल 5,436 बँक खात्यांमध्ये संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याचे आढळले. तसेच या नेटवर्कशी संबंधित 29 गुन्ह्यांची माहिती तपासातून समोर आली आहे. आतापर्यंत पोलिसांनी 1 कोटी 34 लाख रुपये गोठवले आहेत.

रोहन जाधव हा उच्चशिक्षित असून त्याने B.Sc.पर्यंत शिक्षण घेतले आहे. सोशल मीडियावर रील्समुळे त्याची चांगली ओळख निर्माण झाली होती. मात्र, याच काळात तो सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीशी जोडला गेल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले. रोहन मूळचा छत्रपती संभाजीनगरचा असून सध्या पिंपळे गुरव येथे राहत होता.

जानेवारी 2026 मध्ये या टोळीने वृद्ध व्यक्तीला लक्ष्य केले. आरोपींनी त्यांच्या ओळखपत्राचा गैरवापर करून कॅनरा बँकेत खाते उघडले. त्यानंतर फोनवरून संपर्क साधत आपण सीबीआय अधिकारी असल्याचे सांगण्यात आले. वृद्धाच्या खात्याचा वापर गैरकायदेशीर व्यवहारांसाठी झाल्याचे सांगून त्यांना कारवाईची भीती दाखवण्यात आली.
यानंतर ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली वृद्धाला मानसिक दबावाखाली ठेवण्यात आले. अटक टाळायची असेल तर वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे पाठवण्यास सांगण्यात आले. या प्रकाराला घाबरून त्यांनी तब्बल 10 कोटी 74 लाख 65 हजार रुपये आरोपींच्या सांगण्यानुसार वर्ग केले.
तपास करताना 30 जानेवारी रोजी एका बँक खात्यात 75 लाख रुपये जमा झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर बँक व्यवहार, CCTV फुटेज आणि सायबर क्राईम पोर्टलवरील माहितीच्या आधारे तपास पुढे नेण्यात आला आणि रोहनचा माग काढण्यात पोलिसांना यश आले.
या प्रकरणात यापूर्वी हर्षद धनतोले, समर्थ देशमुख, अमर अत्तरगी आणि दिल्लीतील प्रणव आर्या यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, सीबीआय, ईडी किंवा पोलीस अधिकारी फोनवरून पैशांची मागणी करत नाहीत. ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाने कोणी पैसे मागितल्यास नागरिकांनी घाबरू नये आणि तात्काळ 1930 या सायबर हेल्पलाइनवर तक्रार करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.







