उरुळी कांचन, ता. 19 : पुणे-सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन परिसरात दिवसेंदिवस फोफावलेल्या आणि निष्काळजी बेफाम वाहतुकीने अखेर एका कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याचाच बळी घेतला आहे. ‘ससून’ रुग्णालयात मयताचा बंदोबस्त पूर्ण करून उरुळी कांचनला परतल्यानंतर जेवणासाठी रस्ता ओलांडणाऱ्या उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणेश रतन दाभाडे (वय -49, मूळ रा. मेथी, ता. शिंदखेडा, जि. धुळे; सध्या रा. सासवड, ता. पुरंदर) यांचा भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला.

शुक्रवारी (ता. 18) मध्यरात्रीच्या सुमारास उरुळी कांचन हद्दीतील श्रीकृष्ण मंगल कार्यालयासमोर महामार्गावर हा अपघात झाला. याबाबत पोलिस शिपाई आशिष संजय उल्हाळकर यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन येथील पांढरस्थळ परिसरात शुक्रवारी सकाळी पाण्यात वाहत आलेल्या एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहाचे ससून रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पोलिस शिपाई आशिष उल्हाळकरबरोबर पुण्यातील ससून रुग्णालयात गेले होते. मृतदेहाची ओळख पटली नसल्याने तोरुग्णालयाच्या शवागृहात ठेवण्यात आला. त्यानंतर दोघे रात्री उशिरा सरकारी दुचाकीवरून उरुळी कांचनकडे परतले.

उरुळी कांचनजवळ आल्यानंतर दाभाडे यांनी जेवण केले नसल्याचे सांगितले. व ते पुणे-सोलापूर महामार्गावर श्रीकृष्ण मंगल कार्यालयाजवळ उतरले. त्यानंतर रस्ता ओलांडून ते जेवणासाठी एकटेच निघाले होते. यावेळी श्रीकृष्ण मंगल कार्यालयासमोर रस्ता ओलांडताना पुणे-सोलापूर महामार्गावर दाभाडे यांना अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत वाहनाचे चाक त्यांच्या अंगावरून गेल्याने त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाली.
अपघाताची माहिती मिळताच पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. दाभाडे हे बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने उरुळीकांचन प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा आणि चालकाचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, असा परिवार आहे. त्यांच्यावर धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा तालुक्यातील मेथी गावात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
धुळे जिल्ह्यातील ‘मेथी’ गावी होणार अंत्यसंस्कार..
गणेश दाभाडे हे अत्यंत शांत, शिस्तप्रिय, कार्यतत्पर आणि सहकाऱ्यांना सदैव मार्गदर्शन करणारे अधिकारी म्हणून पोलीस दलात परिचित होते. त्यांनी पौड, भोर, सासवड, जेजुरी आणि उरुळी कांचन पोलीस ठाण्यात उल्लेखनिय सेवा बजावली होती. त्यांच्या अचानक जाण्याने उरुळी कांचन पोलीस ठाण्यासह संपूर्ण ग्रामीण पोलीस दलावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या मूळ गावी म्हणजे धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा तालुक्यातील मेथी येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
‘महामार्गावरील यमदूत’ कधी रोखणार?
उरुळी कांचन शहरातून जाणाऱ्या पुणे-सोलापूर महामार्गावर वाहनांचा वेग मर्यादेपेक्षा जास्त असतो. रात्रीच्या वेळी तर अवजड वाहने आणि बेफाम चालक पादचाऱ्यांचे बळी घेत असतात. एका कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्यालाच अशा प्रकारे रस्त्यावर प्राण गमवावे लागल्याने “पुणे-सोलापूर महामार्गावरील ही बेफाम आणि बेशिस्त वाहतूक अजून किती जणांचा बळी घेणार?” असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने त्या पळून गेलेल्या नराधम चालकाला तात्काळ बेड्या ठोकाव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.







