आंबेगाव: पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात घोडीवर अमानुष अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अवसरी खुर्द गावाच्या हद्दीत पिंपळगाव खडकी शिवेजवळ हा प्रकार घडल्याची माहिती आहे. या प्रकरणी मंचर पोलिसांनी चौकशीसाठी एका अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याच्या पोटचारीजवळ एक तांबड्या रंगाची घोडी चरत होती. यावेळी तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. घोडीला खाली पाडून तिचे पाय बांधण्यात आले आणि तिच्यावर क्रूरपणे अत्याचार करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच, इतक्यावरच न थांबता आरोपीने घोडीच्या गुप्तांगात काठ्या घुसवल्याचे समोर आले आहे. या घटनेत घोडी गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत असून, तिच्यावर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर संबंधित मालकाने मंचर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी एका 16 वर्षीय अल्पवयीन संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. संबंधित मुलाविरुद्ध कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

या प्रकारामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. मुक्या प्राण्यांवर अशा प्रकारे अत्याचार होणे ही गंभीर बाब असून, या घटनेची सखोल चौकशी करून दोषी व्यक्तीवर कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.







