पुणे : अमली पदार्थांच्या कथित अवैध व्यवहाराशी वारंवार संबंध आढळून आल्याने मुंढवा पोलिसांनी 32 वर्षीय महिलेविरुद्ध PIT-NDPS Act, 1988 अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. रीना रवी गमाने असे या महिलेचे नाव असून, तिला कोल्हापूर मध्यवर्ती कारागृह, कळंब येथे पोलीस बंदोबस्तात स्थानबद्ध करण्यात आले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, रीना गमाने हिच्याविरुद्ध यापूर्वीही NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंढवा पोलीस ठाण्यात 2022 मध्ये तिच्याविरुद्ध NDPS Act, 1985 मधील संबंधित कलमांनुसार गुन्हा क्रमांक 146/2022 नोंदवण्यात आला होता. या प्रकरणात पुणे सत्र न्यायालयाने 8 ऑगस्ट 2022 रोजी तिला जामीन मंजूर केला होता.

त्यानंतरही ती अमली पदार्थांच्या अवैध व्यवहार करत असल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे 19 मे 2025 रोजी तिच्याविरुद्ध मुंढवा पोलीस ठाण्यात NDPS Act अंतर्गत कलम 8, 20 आणि 29 नुसार गुन्हा क्रमांक 140/2025 दाखल करण्यात आला. या प्रकरणातही अतिरिक्त सत्र न्यायालयाने काही अटी व शर्तींवर तिला जामीन मंजूर केला होता.

दरम्यान, उपलब्ध गुन्हेगारी नोंदींचा आढावा घेतल्यानंतर अमली पदार्थांच्या व्यवहाराशी तिचा वारंवार संबंध असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे अशा प्रकारच्या कथित कारवायांवर प्रतिबंधात्मक नियंत्रण आणण्यासाठी PIT-NDPS Act, 1988 अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला.
हा प्रस्ताव पुणे शहर पोलीस आयुक्तांमार्फत महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. त्यानंतर सक्षम प्राधिकरणाच्या प्रक्रियेनुसार संबंधित महिलेला कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, परिमंडळ 6 चे पोलीस उपायुक्त जीवन बेनिवाल आणि सहायक पोलीस आयुक्त अतुलकुमार नवगिरे यांच्या अधिपत्याखाली करण्यात आली. मुंढवा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) सागर गोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली.






