बीड : जिल्ह्यातील केज तालुक्यातील टाकळी येथे घडलेल्या बहुचर्चित विलास घुले हत्या प्रकरणात सीआयडी तपासाअंती एक महत्त्वाची घडामोडी समोर आली आहे.सुरुवातीपासूनच या गुन्ह्यात बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचा सहभाग असल्याचा संशय आणि आरोप व्यक्त केला जात होता. मात्र, पोलिसांच्या तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल डिटेल्स रेकॉर्डच्या विश्लेषणातून त्यांच्या मुलाचा या गुन्ह्याशी कोणताही संबंध नसल्याचे निष्पन्न झाले आहे. या तांत्रिक पुराव्यांमुळे खासदारपुत्राला सीआयडीकडून मोठा दिलासा मिळाला आहे.

हॉटेल व्यावसायिक विलास घुले यांची दोन गटांतील वाद आणि भांडण मिटवण्यासाठी गेले असताना हत्या करण्यात आली होती. या संपूर्ण घटनेचा सखोल तपास करून सीआयडीने 15 सप्टेंबर रोजी केज न्यायालयात 200 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. या हत्या प्रकरणात 10 जणांविरोधात दोषारोपपत्र नोंदवण्यात आले आहे. विशेष म्हणजे या गुन्ह्यात बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचा सहभाग असल्याचा संशय होता. मात्र आता त्यांना दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, मृत विलास घुले यांचे बंधू रमेश घुले यांनी तपास अधिकाऱ्यांवर आरोप करताना म्हटले आहे की, दाखल केलेले दोषारोपपत्र त्यांना अद्याप दाखवण्यात आलेले नाही. घटनेनंतर प्राथमिक तपास केज पोलिसांकडून सुरू करण्यात आला. तपासाची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेऊन आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची नियुक्ती करण्यात आली. एसआयटीने सुमारे दोन महिने या प्रकरणाचा तपास केला.

त्यानंतर हे प्रकरण राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवण्यात आले. सीआयडीने आता न्यायालयात अधिकृत दोषारोपपत्र दाखल केल्यामुळे या प्रकरणाची पुढील कारवाई आणि सुनावणी न्यायालयीन पातळीवर सुरू झाली आहे.







