उरुळी कांचन : येथील स्वामी विवेकानंद विद्यामंदिरची 14 वर्षे वयोगटातील ज्ञानेश्वरी कांचन हिने 44 किलो वजनगटात प्रथम क्रमांक मिळवत जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली. यामध्ये विद्यार्थिनींनी दमदार कामगिरी करत विविध वजनगटांत प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावले. स्वामी विवेकानंद विद्यामंदिरच्या विद्यार्थिनींनी या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.

शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन, क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि जिल्हा क्रीडा परिषद, पुणे यांच्या वतीने हवेली तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा गुरुवारी (17 सप्टेंबर) जोगेश्वरी माता माध्यमिक विद्यालय, वाडेबोल्हाई येथे पार पडल्या. या स्पर्धेत 14, 17 आणि 19 वर्षे वयोगटातील मुला-मुलींसह सुमारे 700 ते 800 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

14 वर्षे वयोगटातील 44 किलो वजनगटात ज्ञानेश्वरी कांचन (इयत्ता 8 वी-अ) हिने प्रथम क्रमांक पटकावला. तर 50 किलो वजनगटात समृद्धी शेलार (इयत्ता 8 वी-इ) आणि 58 किलो वजनगटात स्वराली म्हेत्रे (इयत्ता 7 वी-ड) यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. 17 वर्षे वयोगटातही विद्यार्थिनींनी आपली चमक दाखवली. 57 किलो वजनगटात स्वरा ढवळे (इयत्ता 10 वी-अ), तर 43 किलो वजनगटात सिद्धी इंगळे (इयत्ता 10 वी-अ) यांनी द्वितीय क्रमांक पटकावला.

ज्ञानेश्वरीची जिल्हास्तरावर झेप
या स्पर्धेत 44 किलो वजनगटात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या ज्ञानेश्वरी कांचनची इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरीकडून आता जिल्हास्तरावरही दमदार कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या यशामागे संस्थेच्या माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका साळुंके, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका खेडेकर, मार्गदर्शक चव्हाण सर, क्रीडाशिक्षक सुहास पोळ, लोखंडे मॅडम तसेच क्रीडा प्रशिक्षक संभाजी भिडे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थिनींच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुरेश कांचन, उपाध्यक्ष सुरेश सातव, सचिव पंडित कांचन, खजिनदार प्रकाश वामन कांचन, व्यवस्थापक संभाजी कांचन, तसेच संस्थेचे सर्व विश्वस्त यांनी यशस्वी विद्यार्थिनी, मार्गदर्शक शिक्षक आणि क्रीडा विभागाचे अभिनंदन केले. पुढील स्पर्धांसाठी त्यांनी विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या.







