अकोला: राज्यात पावसाने दांडी दिल्यामुळे खरीप हंगाम वाया गेला असून शेतकरी प्रचंड संकटात सापडला आहे. दुष्काळसदृश परिस्थितीमुळे बळीराजा सरकारी मदतीची चातकासारखी वाट पाहत आहे. या गंभीर पार्श्वभूमीवर प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या असून रविवारी अकोल्यात विदर्भातील 8 जिल्हे आणि 56 तालुक्यांची दुष्काळ आढावा बैठक पार पडली. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र, या महत्त्वपूर्ण बैठकीत प्रशासकीय अधिकाऱ्यांचे बेजबाबदार वर्तन समोर आले आहे.

एकिकडे मंत्री आणि लोकप्रतिनिधी शेतातील संकटावर अन् दुष्काळावर चर्चा करत असताना, दुसरीकडे बैठकीस उपस्थित असलेले अनेक वरिष्ठ अधिकारी आपल्या मोबाईलमध्ये मग्न असल्याचे पाहायला मिळाले. काही अधिकारी व्हॉट्सॲप मेसेज तपासण्यात तर काही फेसबुकसारख्या सोशल मीडियावर स्क्रोलिंग करण्यात व्यस्त होते. नुकतेच नांदेडमधील आढावा बैठकीत नेते आणि मंत्र्यांनी काजू-बदाम खाण्यावरून टीका सहन केली होती.

त्यानंतर आता अकोल्यात अधिकाऱ्यांच्या या अशोभनीय वर्तनामुळे प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
कृषिमंत्री एकीकडे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे आहे आणि योग्य ते निर्णय घेण्यास तयार आहे असा दावा करत आहेत. परंतु, प्रत्यक्षात प्रशासकीय यंत्रणा शेतकरी आणि त्यांच्या प्रश्नांबद्दल किती गंभीर आहे, याचे विदारक चित्र या घटनेमुळे स्पष्ट झाले आहे.

ऐन दुष्काळाच्या काळात अधिकाऱ्यांनी दाखवलेल्या या उदासीनतेमुळे शेतकरी आणि नागरिक यांच्यातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.






