पुणे : मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात बेकायदेशीर विक्रीसाठी आणला जात असलेला प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाला अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) पथकाने कारवाई करून जप्त केला. या कारवाईत गुटखा, पानमसाला आणि ट्रक असा एकूण १ कोटी १३ लाख ५४ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एफडीएच्या पथकाने तब्बल सहा तास पाठलाग करून हा ट्रक ताब्यात घेतला.

एफडीएच्या अधिकाऱ्यांना मध्यप्रदेशातून मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा महाराष्ट्रात आणला जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार १८ सप्टेंबर रोजी पथकाने संशयित ट्रकचा माग काढण्यास सुरुवात केली. संगमनेरपासून राजगुरुनगर टोलनाक्यापर्यंत सुमारे सहा तास या ट्रकचा पाठलाग करण्यात आला. अखेर राजगुरुनगर टोलनाक्याजवळ ट्रक ताब्यात घेण्यात एफडीएच्या पथकाला यश आले.

या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या तक्रारीवरून चाकण उत्तर पोलीस ठाण्यात चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहनचालक नफीस मेहबूब खान, पुरवठादार निलेश राठी आणि अरुण पाटील, वाहनमालक मेसर्स जे. एम. डी. इंटरप्रायझेस तसेच वाहतूकदार संजय माटा यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची मोठ्या प्रमाणावर वाहतूक केल्याने हे प्रकरण संघटित गुन्हेगारीशी संबंधित असल्याचा दावा एफडीएकडून करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित आरोपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मोक्का (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्याची शिफारस अन्न व औषध प्रशासनाने पोलिसांकडे केली आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास चाकण उत्तर पोलीस करत असून जप्त करण्यात आलेल्या गुटखा आणि पानमसाल्याच्या साठ्याचा तसेच त्याच्या पुरवठा साखळीचा तपास केला जात आहे.







