पुणे : राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दौऱ्यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवड केली. यासाठी मी मुख्यमंत्र्यांचं मनापासून आभार मानतो. त्यांचं शिरूर लोकसभा मतदारसंघात नक्कीच स्वागत आहे. पण तुम्ही येताना कांद्यावरची निर्यातबंदी उठली आहे, बिबटप्रवण क्षेत्रात थ्री फेज लाईट दिली आहे आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट पाच रूपये अनुदान आहे असे निर्णय घेऊन शिरूर लोकसभा मतदारसंघात या. आपलं स्वागत आहे, असं अमोल कोल्हे म्हणाले.
दरम्यान, यावेळी पत्रकारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका विधानाबाबत विचारणा केली असता अमोल कोल्हेंनी त्यावरून राज्यातील महायुती सरकारमधील घटकपक्षांना टोला लगावला. ‘देशात भाजपा सक्षम असून दुसऱ्या आघाडीची देशाला गरज नाही’ असं मोदींनी म्हटल्याचं माध्यमांनी विचारलं. यावर अमोल कोल्हे म्हणाले, असं पंतप्रधान म्हणत असतील तर महायुतीचं नेमकं काय होणार? महायुतीतल्या घटकपक्षांसाठी पंतप्रधानांचं विधान चिंता करायला लावणारं आहे.
यावेळी अजित पवारांनीही दौरा काढल्याचा मुद्दा माध्यम प्रतिनिधींनी उपस्थित करताच त्यावरही अमोल कोल्हेंनी खोचक टिप्पणी केली. प्रत्येकाचा राजकीय पक्ष आहे. ते वेगवेगळे दौरे करत आहेत. पण महत्त्वाच्या पदावर बसलेल्या व्यक्तींनी केलेले दौरे राजकीय आहेत की खरंच जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आहेत हा प्रश्न जनतेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन तुम्ही जर हे दौरे केले, तर ती भूमिका जास्त महत्त्वाची ठरेल, असं अमोल कोल्हे म्हणाले.