संदिप टूले
केडगाव : दौंड तालुक्यातील यवत येथे कोट्यावधी रुपये खर्च करून ट्रामा केअर सेंटर आणि ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आले आहे. मात्र याठिकाणी इमारत उभारण्यात आली खरं पण रुग्णालयाच्या सेवेत असणाऱ्या रुग्णवहीका डिझेलविना उभ्या असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. यामुळे यवत रुग्णालयात प्रशासनाचा सावळा गोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. या रुग्नालयाचे अधीक्षक म्हणून नव्याने रुजू झालेले डॉ. किशोर पत्की यांच्यापुढे ग्रामीण रुग्णालय आणि ट्रामा केअर सेंटर सुरु करण्याचे मोठे आवाहन असल्याचे बोलले जात आहे.
यवत येथे ग्रामीण रुग्णालय आणि ट्रॉमा केअर सेंटरसाठी शासनाकडून कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आला आहे. या रुग्णालयात रुग्णांना शासनाच्या सर्व सोई देण्यात येतात. मात्र २५ मे रोजी एका पोल्ट्रीवर काम करणाऱ्या कामगारांला सर्पदंश झाला होता. त्या रुग्णाला यवत ग्रामीण रुग्नालयात दाखल करण्यात आले होते. अमीर उघडे (वय-२५, रा. मोहोळ पोल्ट्री, मूळ रा. संगमनेर, नाशिक) असे सर्पदंश झालेल्या रुग्णाचे नाव आहे.
दरम्यान, रुग्णालयात डॉ. पेंडोर यांनी रुग्णालय अधीक्षक डॉ. किशोर पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णावर प्राथमिक उपचार केले. मात्र, रुग्णाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारसाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यावेळी १०८ नंबरच्या रुग्णवाहिकेतुन रुग्णाला नेण्याचे ठरले होते. मात्र, १०८ ची रुग्णावाहीका येण्यासाठी दीड तास लागेल अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.
दरम्यान, यवत ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिका असतानाही बाहेरून रुग्णवाहिका का बोलावली? असा प्रश्न रुग्णाच्या नातेवाईकांनी केला असता रुग्णालय प्रशासनाने त्या रुग्णवाहिकामध्ये डिझेल नसल्याने त्या उभ्या असल्याची धक्कादायक माहिती देण्यात आली आहे. रुग्णालयाच्या रुग्णवहीका असून देखील रुग्णाला खासगी रुग्णवाहिकेतून ससून येथे हलविण्यात आले. यामुळे यावत ग्रामीण रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. कोट्यावधी रुपये खर्च करून रुग्णलायातील रुग्णवाहिका डिझेलविना उभ्या असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
सर्पदंश झालेल्या रुग्णाला औषधोपचार, लस, इंजेकशन दिले असून पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. रुग्णावाहीकेचे निवडणुकी कालावधीमुळे बिले मागे पुढे झाले आहेत, अशी अडचण भविष्यात येऊ देणार नाही. नातेवाईक यांनी देखील गडबड करून खासगी रुग्णवाहिकेत रुग्ण ससूनला घेऊन गेले. ट्रामा केअर सेंटर सुरु करण्याबाबत वरिष्ठाशी चर्चा केली असून १ जून ला सुरु करणार आहोत. .त्यासाठी आवश्यक डॉक्टर कर्मचारी यांची देखील मागणी केली आहे.
-डॉ. किशोर पत्की (वैद्यकीय अधीक्षक, यवत ग्रामीण रुग्णालय)