बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांचे उद्याचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या अनेक सभा झाल्या. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार हे पायाला भिंगरी लावल्यागत निवडणूक प्रचारात फिरत होते. मात्र, या सभांच्या आणि दौऱ्यांच्या धावपळीचा ताण आल्याने त्यांची प्रकृती अस्वस्थ झाली आहे. त्यामुळे शरद पवारांचे उद्याचे नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती पक्षाच्या वतीने देण्यात आली आहे.
दरम्यान, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यात शरद पवार यांनी महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारांसाठी जाहीर सभा घेतल्या. या सभांसाठी हजारो किमींचा प्रवास त्यांनी गेल्या काही दिवसांत केला आहे. तर, प्रत्येक सभेत जाहीर भाषणही केली आहेत. मात्र, दौऱ्यांच्या धावपळीमुळे शरद पवार यांची प्रकृती बिघडली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आज बारामती येथे शरद पवार यांनी सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी सांगता सभा घेतली होती. मात्र, या सभेवेळी शरद पवार यांना काहीसा त्रास जाणवल्याने त्यांनी थोडक्यात भाषण केलं. या सभेत बोलतानाही त्यांचा आवाज कातर होत होता. घसा बसल्याने शब्द नीट फुटत नव्हते. अशातच आता शरद पवार गटाच्या वतीने सांगण्यात आलं आहे की, शरद पवार यांचे उद्याचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द
शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे साहेबांचे उद्या सहा मे रोजीचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. उद्या ६ मे रोजी कात्रज येथील नियोजित सभाही रद्द करण्यात आली असून याची सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी नोंद घ्यावी, अशी माहिती पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देण्यात आली आहे. दरम्यान, सध्या शरद पवार हे बारामती येथील त्यांचं निवासस्थान असलेल्या गोविंद बागेत आहेत. दुपारची सांगता सभा झाल्यानंतर ते गोविंद बागेत आले, यानंतर आज शरद पवार हे येथेच मुक्काम करणार असल्याची माहिती मिळत आहे.