बारामती : आज अजित पवारांनी ताफा थांबवत जखमी पत्रकाराला मदत केली आहे. त्यांच्या या कार्याने अजित पवारांनी अनेकांची मनं जिंकली आहेत. बारामतीहून काटेवाडीकडे जात असताना वाटेत झालेला अपघात पाहून क्षणात आपला ताफा थांबवून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्वतःच्या गाडीतून जखमी पत्रकाराला रुग्णालयात दाखल केलं. विशेष म्हणजे त्यांनी रुग्णालयात डॉक्टरांना उपचाराबाबत सुचना देखील दिल्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज कन्हेरी मारोतीचं दर्शन घेण्यासाठी बारामतीवरून काटेवाडीकडे जात होते. त्यावेळी रस्त्यात जेष्ठ पत्रकार रामभाऊ तावरे यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात तावरे हे जखमी झाले होते. यावेळी अजित पवार यांनी आपला ताफा थांबवून तत्परता दाखवत जखमी झालेले तावरे यांना आपल्या गाडीतून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. एवढंच नाही तर त्यांनी रुग्णालयात उपचाराबाबत सुचना देखील दिल्या.
नेमकं काय घडलं?
सोनगाव येथील आनंदराव देवकाते पत्नी यांच्यासह आपल्या कारमधून बारामतीहून सोनगाव कडे निघाले होते. त्यावेळी जेष्ठ पत्रकार रामभाऊ तावरे यांच्या दुचाकीची कारला धडक होऊन तावरे खाली पडले. त्यानंतर काही वेळातच तिथून कन्हेरीकडे जात असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली गाडी थांबवली.
हे तर रामभाऊ, असं म्हणत तातडीने स्वत:च्या ताफ्यातील गाडीत तावरे यांना बसवून दवाखान्यात पाठवले. तावरे यांच्या पायाला किरकोळ जखम झाली आहे. मात्र अशातही क्षणाचा विलंब न करता अजित पवार यांनी स्वतः पुढे होत दाखवलेली ही तत्परता सर्वांना भावली आहे.