पुणे : बारामतीतील लोकसभा मतदारसंघातील भोरमध्ये मतदारांना पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप रोहित पवार यांनी ट्विट करत केला आहे. अजित पवार मित्रमंडळाकडून पैसे वाटप होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पलटवार करत हे आरोप फेटाळले आहेत. आरोप करणाऱ्यांचं डोकं फिरलं आहे, असं अजित पवार म्हणले. काटेवाडीत मतदान केल्यानंतर अजित पवारांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
काय म्हणाले अजित पवार?
अजित पवार म्हणाले, ते सध्या आमच्यावर आरोप करत आहेत. मी देखील त्यांनी अतिशय चुकीच्या पद्धतीने निवडणुकीची हाताळणी केला असा आरोप करू शकतो. परंतु मी आरोप करणार नाही. ते काहीपण आरोप करत सुटले आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँक उघडी असल्याचे कोणी पाहिले का? तो व्हिडीओ कालचा होता का? याची कोणी शाहनिशा केली का? समोर आरोप करणाऱ्या व्यक्तीवर परिणाम झाला असून तो काही आरोप करतो. त्या आरोपाला माझ्या दृष्टीकोनातून महत्त्त्व द्यावे असे वाटत नाही. त्याच्या प्रश्नाला उत्तर देण्याची देखील मला गरज वाटत नाही.
हे काम निवडणूक आयोगाचे आहे. मी सात विधानसभा लोकसभा निवडणुका लढवल्या आहेत. आजपर्यंत असे मी कधी केले नाही आणि करणार नाही. कारण नसताना विरोधकांमधील काही बागलबच्चे असे धांदत आरोप करत आहे. मी त्याला महत्त्व देत नाही, तसेच प्रचाराच्या रणधुमाळीत माझ्यावर वेगवेगळ्या आरोपाचा धुराळा उडवला आहे.
मी त्या गोष्टीला जास्त महत्त्व देत नाही. मी विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूकीत ही प्रचार केला. या मतदारसंघात आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला आहे. मी शेवटच्या सभेपर्यंत सांगितले की, ही भावकिची गावकीची निवडणूक नाही. ही निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी तसेच पुढील पाच वर्षाचा विकास हे डोळ्यासमोर ठेवूनच मतदान करा असे मी शेवटपर्यंत सांगितल्याचे अजित पवार म्हणाले.