बारामती : अजित पवार सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री असले तरी पुढील सरकारमध्ये मुख्यमंत्री व्हावेत अशी कार्यकर्ते आणि आमदारांची भावना आहे. अनेक जाहीर कार्यक्रमांमध्ये नेत्यांकडून ही भावना बोलून दाखवली जात आहे. अजित पवारांना या उत्साही नेते आणि कार्यकर्त्यांना जरा धीर धरा असा सल्ला काही दिवसांपूर्वी झालेल्या सभेत दिला होता.
अजित दादांचे कार्यकर्ते आता थांबायचे नाव घेईनात. काही दिवसापूर्वीच अजित पवार यांनी उत्साही नेते आणि कार्यकर्त्यांना जरा धीर धरा असा सल्ला भर सभेत दिला होता. आज पुन्हा अजित पवारांसमोरच एका कार्यकर्त्याने तुम्ही मुख्यमंत्री व्हा अशी मागणी केली आहे. बारामतीत अजित पवार यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं.
यावेळी भाषण सुरु असतानाच एक कार्यकर्ता ‘दादा तुम्ही मुख्यमंत्री व्हा’ असं ओरडला. त्यावर अजित पवारांनी आपल्या नेहमीच्या शैलीत भन्नाट उत्तर दिलं आहे. ‘तू चंद्रावर जा आणि मला मुख्यमंत्री व्हायला सांग’ असं अजित पवार म्हणाले. यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
पाचव्यांचा राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून काम करतोय : अजित पवार
पाचव्यांचा राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहे. माझ्याकडे अर्थ आणि नियोजन खात्याची जबाबदारी असताना राज्यासह आपल्याही तालुक्याला मदत व्हावी यासाठी प्रयत्न करत आहे. मी जरी सतत बारामतीत येत नसलो तरी कारखाने कसे सुरु आहेत, येथील प्रश्न, अपेक्षा यांची जाणीव आहे, असं अजित पवारांनी सांगितलं.
पुढे बोलताना म्हणाले, बारामती नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका अद्याप झालेल्या नाहीत. सुप्रीम कोर्टात प्रकरण प्रलंबित असल्याने निवडणुका लांबल्या आहेत. निवडणुका घेता येत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये थोडी अस्वस्थता आहे, असंही अजित पवार म्हणाले.