योगेश शेंडगे
शिक्रापूर : शिरूर तालुक्यातून अनेक गावांमध्ये बाजरी बियाणे उगवले नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी समोर आल्या होत्या. तालुक्यातील न्हावरे,
इंगळेनगर, दहिवडी, पारोडी, विठ्ठलवाडी, निमगाव म्हाळुंगी अशा अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांनी पेरणी केलेले बाजरी बियाणे उगवले नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत.
कृषी अधिकाऱ्यांकडे लेखी स्वरूपात तक्रार करून सहा दिवस उलटूनही अद्याप कृषि अधिकारी पंचायत समिती शिरूर यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद शेतकऱ्यांना न मिळाल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. कृषी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर यायला वेळ नाही का? कृषी अधिकारी कृषी सेवा केंद्राकडून वसुली करण्यात मग्न आहेत, अशी चर्चा शेतकरी वर्गामध्ये केली जात आहे.
यंदा चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी लवकरच पेरण्या उरकल्या, शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात एका खाजगी कंपनीचे (मे. कोरटेव्हा ऍग्रो सायन्स सीड्स . प्रा .लि .मधापुर हैदराबाद तेलंगणा),(८६ एम३८) या कंपनीच्या बाजरी बियाणाची पेरणी केली होती.
मात्र, काही ठिकाणी बियाणे नित्कृष्ट दर्जाचे निघाल्याने उगवणच झाली नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. पेरणीसाठी शेतकऱ्यांनी एकरी जवळपास १० ते १५ हजार रुपयांचा खर्च केला आहे. याबाबत शेतकऱ्यांनी बियाणे देणारे डिलर,( न्हावरे येथील शेतकरी कृषी सेवा केंद्र ) यांच्याकडे व कृषी अधिकाऱ्यांकडे तोंडी व लेखी ई-मेलद्वारे तक्रारी केल्या व नुकसानभरपाई देण्याची मागणी केली होती.
कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ, कधी गारपीट तर कधी दुबार पेरणी, या संकटामुळे शेतकरी होरपळून निघत आहे. संकटाशी मुकाबला करत शेतकरी वर्षभराचे नियोजन करून पीक लागवड करताना दिसत आहे. शेतकरी आज बोगस बाजरी बियाणांमुळे उद्भवलेल्या पेरणीच्या संकटामुळे त्रस्त आहेत. अगोदरच प्रचंड हालअपेष्टांनी युक्त जीवन जगणाऱ्या बळीराजाला दुबार पेरणी करावी लागते.
रामदास इंगळे या शेतकऱ्यानी दोन वेळेस पेरणी करूनही बियाणे न उगवल्याचे सांगितले. कृषी विभागाकडून न्याय मिळण्याचे संकेत दिसत नसल्याने व कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून उडवा उडवी चे उत्तर मिळाल्याने इंगळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
तसेच अक्षय टेमगिरे या शेतकऱ्यानी सांगितले की, कृषी विभागाकडून वेळेचे गांभीर्य लक्षात घेता व दुबार पेरणीच्या उद्देशाने शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीचे तात्काळ निवारण होणे गरजेचे होते ,परंतु कृषी विभागाकडून तसे काहीच झाले नाही.बियाणे कंपनीचे कर्मचारी (ज्योतीराम गोडसे) यांच्याकडून शेतकऱ्यांना सतत उडवा-उडवीडीची उत्तरे व आरेवारीची भाषा ऐकायला मिळाल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. कृषी विभागाकडून न्याय मिळत नसल्याने शिरूर तालुक्यात बहुतांश शेतकरी असे आहेत की बाजरी बियाणे न उगवल्याने ही तक्रार करत नसल्याचे टेमगिरे यांनी सांगितले.याबाबत लवकर न्याय न मिळाल्यास कृषि विभागापुढे आंदोलन करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना ठेवले जाते भ्रमात
जर एखाद्या शेतकऱ्याने बियाणे उगवले नसल्यासंदर्भात कृषी सेवा केंद्र अथवा बियाणे कंपनीकडे तक्रार करण्यासाठी गेले असता किंवा फोन केला असता समोरून एकच उत्तर ऐकायला मिळते की, “फक्त तुमचीच बाजरी उगवली नाही बाकी सर्वांची उगवली आहे” त्यामुळे शेतकऱ्याला स्वतःची चूक वाटते. अशा भ्रमात त्याला ठेवले जाते.
ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या आहेत, त्या शेतकऱ्यांच्या शेतात या आठवड्यात पाहणी करण्यात येईल.
-अमित रानवारे (कृषी अधिकारी पंचायत समिती, शिरूर)