संतोष पवार
इंदापूर : कळस येथे कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ड्रोनव्दारे पिकांवर औषध फवारणीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. येथील संतोष धायतोंडे यांच्या उस पिकावर ड्रोनव्दारे औषध फवारणी करुन, शेतकऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली. कमी वेळेत जास्तीच्या क्षेत्रावर औषध फवारणी करता येत असल्याने, याचा शेतकऱ्यांमध्ये वापर वाढावा या दृष्टीकोनातून प्रात्यक्षिकाव्दारे माहिती देण्याचे काम तालुक्यात केले जाणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब रुपनवर यांनी सांगितले.
ते म्हणाले, शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन पिक स्पर्धेत सहभागी होणे गरजेचे आहे. यातून तालुकास्तरी, जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय बक्षिसास पात्र ठरण्याच्या दृष्टीने पिकांचे उत्पन्न घेतले पाहिजे. यासाठी कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून स्पर्धेत सहभागी होण्याविषयी माहिती घ्यावी. सध्या ड्रोनव्दारे पिकांवर औषध फवारणीचे तंत्रज्ञान रुढ होवू लागले आहे. यातून शेतातील पिकांना कमी पाण्यात व कमी वेळत औषध फवारणी करता येणे शक्य होत आहे. यासाठी कृषी विभागाने माऊली ग्रीन आर्मीच्या मदतीने प्रात्यक्षिक दाखविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. यातून शेतकऱ्यांना औषध फवारणीच्या फायद्यांबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.
गावातील सुशिक्षित बेरोजगार, औषध दुकानदार, ग्रामपंचायत यांनी औषध फवारणीचा ड्रोन व्यावसायिकतेसाठी उपलब्ध केल्यास याचा फायदा संबंधित व्यक्ती अथवी अस्थापनेस होणार आहे. भविष्यात ड्रोनची मागणी वाढणार असल्याने यासाठी तालुक्यातील विद्या प्रतिष्ठाण पाॅलिटेक्नीकल काॅलेजमध्ये १५ दिवसांच्या प्रशिक्षणाची सोय करण्यात आली आहे. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या व्यक्तीस प्रमाणपत्र दिले जाणार असून, ड्रोन खरेदीसाठी बँकेकडून घेण्यात येणाऱ्या कर्जासाठी ते आवश्यक ठरत आहे. शिवाय कृषी विभागाच्या माध्यमातून ३५ ते ७५ टक्क्यांपर्यंत अनुदान उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब रुपनवर यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, कळस येथे ड्रोनव्दारे औषध फवारणीचे प्रात्यक्षिक पाहण्यासाठी गावातील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी मंडल कृषी अधिकारी के. जी. पिसाळ, कृषी पर्यवेक्षक एस. एन. सरडे, कृषी सेवक एन. एन. टिळेकर, कृषी सहाय्यक एस. डी. झगडे, पी. बी. मोहोळकर, पी. बी. काळे, एस. जे. धुरगुडे, एस. जी. साळवे, एस. जी. मोरे, एस. बी. खरात, सुनिल ओमासे, विजय गावडे, दत्तात्रेय खारतोडे, संजय राऊत, श्याम धायतोंडे, दिलीप खटके, माउली संस्थेचे बाळासाहेब सानप, महादेव शिरसट यांसह गरोडे ड्रोन कंपनीचे प्रतिनिधी व शेतकरी उपस्थित होते.