पुणे: नीट (NEET) आणि सीबीएसई (CBSE) परीक्षांमध्ये झालेल्या कथित गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (CJP) अधिक आक्रमक झाली आहे. या गोंधळाची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्वरित आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी आग्रही मागणी या पक्षाने केली आहे. या आंदोलनाची पहिली ठिणगी जून 6 रोजी दिल्लीतील जंतर मंतर येथे पडली. पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके हे परदेशवारीवरून परतल्यानंतर थेट दिल्लीतील आंदोलनात सहभागी झाले होते.

दिल्लीच्या निदर्शनांनंतर, सीजेपीने शिक्षण मंत्र्यांना राजीनामा देण्यासाठी 7 दिवसांची डेडलाईन दिली आहे. जोपर्यंत ही मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन देशभर व्यापक करण्याचे आणि आपला लढा अधिक तीव्र करण्याचा पवित्रा पक्षाने घेतला आहे. याच मालिकेतील दुसरे आंदोलन आता पुण्यात होणार आहे. गुरुवारी, जून 11 रोजी सायंकाळी 4 वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात हे निदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
हे आंदोलन पूर्णतः शांततेच्या मार्गाने केले जाईल, असा विश्वास पक्षाने व्यक्त केला आहे. सोशल मीडियाद्वारे अभिजित दिपके यांनी या आंदोलनाची माहिती देत समर्थकांना मोठ्या संख्येत उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
विद्यार्थ्यांच्या भविष्याचा मुद्दा ऐरणीवर आणून सरकारवर दबाव वाढवण्याचा हा पक्षाचा प्रयत्न किती यशस्वी होतो आणि पुण्यातील या आंदोलनानंतर राजकीय वातावरण काय वळण घेते, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.







