शिरूर : बारामती लोकसभापाठोपाठ आता शिरूरमध्येही एका अपक्ष उमेदवाराला तुतारी चिन्ह देण्यात आलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अमोल कोल्हे यांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीत अर्ज दाखल केलेल्या अपक्ष उमेदवारांना नुकतंच चिन्हांचं वाटप करण्यात आलं आहे.
यामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार मनोहर वाडेकर यांना ट्रम्पेट हे चिन्ह देण्यात आलं आहे. या चिन्हाचं आयोगाकडून मराठीत तुतारी असे भाषांतर करण्यात आलं आहे. खरंतर हे चिन्ह दिसण्यास राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या चिन्हापेक्षा पूर्णपणे वेगळं आहे. मात्र आयोगाने ट्रम्पेटचं भाषांतर तुतारी असं केल्याने मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या फुटीनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे नवं पक्षचिन्ह दिलं आहे. मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काही अपक्ष उमेदवारांनाही तुतारी हे चिन्ह दिलं असल्याने मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे.
काय म्हणाले तुतारी चिन्ह मिळालेले वाडेकर?
अपक्ष उमेदवार मनोहर वाडेकर यांनी निवडणूक आयोगाकडे तुतारी या चिन्हाची मागणी केली होती. त्यानुसार लोकसभा निवडणुकीसाठी त्यांना हे चिन्ह मिळालं आहे. याबाबत वाडेकर म्हणाले, मी निवडणूक आयोगाकडे मागितल्याप्रमाणे मला तुतारी हे चिन्ह मिळालं आहे. माझ्या समोरच्या उमेदवाराला तुतारी फुंकणारा माणूस हे चिन्ह मिळालं आहे. त्यामुळे या चिन्हामध्ये मतदारांची दिशाभूल होणार नाही, असं वाडेकर यांनी स्पष्ट केलं आहे.