फुरसुंगी : आपण ज्या शाळेत शिकलो, त्या शाळेत पुन्हा, त्याच दहावीच्या बेंचवर बसायचा आनंदच वेगळा… त्याच बेंचवर बसून त्याच विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा शाळेत असण्याचा आनंद तर अनुभवला.. पण यावेळी होत्या गहिऱ्या आठवणी, ज्या मनात दाटून आलेल्या.. असाच रंगला होता 19 वर्षानंतर फुरसुंगी (ता. हवेली) येथील न्यू इंग्लिश स्कूल फुरसुंगी मधील दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा.
फुरसुंगीच्या न्यू इंग्लिश शाळेत सन 2005-06 मध्ये इयत्ता दहावी क मधील माजी विद्यार्थी पुन्हा एकत्र आले. उरूळी देवाची येथील वृंदावन हॉल येथे या स्नेह मेळाव्याचे आयोजन 9 नोव्हेंबरला करण्यात आले होते. विद्यालयाचे माजी विद्यार्थी व विद्यार्थीनींनी पुढाकार घेऊन या मेळाव्याचे आयोजन केले होते. या निमित्ताने अनेक विद्यार्थी एकमेकांना भेटले. त्यामुळे अनेक जुन्या आठवणींना नव्याने उजाळा मिळाला. सर्वजण थट्टा मस्करी मध्ये दंग झाले. अनेकांना आपले शाळेचे जुने मित्र भेटल्यामुळे चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता, तर अनेकांनी ही भेट आणि या आठवणी पुढील आयुष्यासाठी आयुष्यभर प्रेरणा आणि उत्साह देत राहतील अशा प्रकारे आपले मनोगत व्यक्त केले.
दरम्यान, या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले ,सावित्रीबाई फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून तसेच दीपप्रज्वलन करून झाली. मनोगत व्यक्त करताना माजी विद्यार्थ्यांनी स्वतःची ओळख सांगत मनोगत व्यक्त केले. शिक्षकांनीही यावेळीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमामध्ये सर्व शिक्षकांना भेटवस्तू तसेच शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी बोलताना माजी प्राचार्या आशाताई पवार म्हणाल्या की, आयुष्यात पुढे जाऊन ही आयुष्य कसं जगावं, आता तुम्ही शाळेत नाही तर आयुष्याच्या परिक्षेत बसलेले आहात आणि ही परीक्षा आता शेवटपर्यंत आहे. यातून येणारे अनुभव तुमच्या आयुष्याची शिदोरी बांधतील आणि आयुष्य कसं जगांवं याचंही ज्ञान देतील. यासोबतच तुम्ही आता तुमच्या मुलांचं भवितव्य चांगलं आणि यशस्वी घडवा.
या स्नेह मेळाव्यात न्यू इंग्लिश स्कूल फुरसुंगी शाळेच्या माजी प्राचार्या आशाताई पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. अनिल कामठे , भोंडवे मॅडम , एम. आर.जगताप सर आणि ए. व्ही. पवार सर असा शिक्षक वृंद या ठिकाणी उपस्थित होता. यासाठी पल्लवी तुपे, प्रमिला लांभाते, मनोज सायकर, विशाल सरोदे, संदीप गायकवाड, योगेश कामठे, किशोर परदेशी आणि लक्ष्मण गायकवाड यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष देवकर व सचिव भोंडवे यांनी केले. तर आभार स्वाती मोडक व चैत्राली बोरकर यांनी मानले.
वाढले जरी वय तरी,
आठवणी मात्र तरूण ठेवू,
मैत्रीची ओलावा जपण्यासाठी मित्रहो!
सवडीने आपण भेटत राहू…
असे म्हणत म्हणत…शिक्षक विद्यार्थी मेळाव्याचा समारोप करण्यात आला.