संदिप टूले
केडगाव : दौंड तालुक्यात सध्या घरगुती व शेती पंपाच्या वीज बिल वसुली बरोबरच वीज चोरी करणाऱ्या आकडेबहाद्दरांविरुद्ध महावितरणने जोरदार मोहीम राबविली आहे. यामध्ये राहु परिसरातील मगरवाडी, पिंपळगाव, दाहिटने, लडकतवाडी, नाथाचीवाडी, देलवडी, येथील अनेक जणांवर नुकतीच कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
महावितरण सांघिक कार्यालयाच्या आदेशावरून मार्च मध्ये सर्वत्र कायमस्वरुपी खंडित झालेल्या ग्राहकांची तपासणी व कार्यवाही सुरु आहे. यासाठी महावितरणने स्थानिक पातळीवर पथके तयार केली असून त्यांच्याकडे घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक वर्गवारीसह इतर वर्गवारीतील कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांच्या तपासणीची जबाबदारी ठरवून दिली आहे.
तसेच स्थानिक पातळीवर प्रत्यक्ष पाहणी करुन तपासणीतील सर्व निरीक्षणे महावितरणच्या ॲपद्वारे ऑनलाईन नोंदवायची आहेत. त्यामुळे पाहणी दरम्यान अनेक वीजचोऱ्याही उघडकीस येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यामध्ये महावितरणने विजजोडणी तोडल्यानंतर काही ग्रामस्थांकडून परस्पर बेकायदेशीरपणे वीज वाहक तारावर आकडा टाकून वीज चोरी केली जाते.
अशा ग्रामस्थांवर महावितरणने कारवाईचा बडगा उगारला आहे. विशेष भरारी पथकामार्फत संबंधित जागेवर छापा टाकून विजचोरी करणाऱ्यांकडून दंडही वसूल करण्यास सुरुवात केली आहे. तसेच दंड न भरल्यास कायदेशीर कारवाईचा धडाका लावला आहे.
वीजबिलाचा भरणा करुन सहकार्य करा
वीज चोरी करणाऱ्यांवर यापुढेही अशीच जोरदार मोहीम राबवली जाणार आहे. कायमस्वरूपी वीज पुरवठा बंद करूनही वीज वापरत असलेले व विजेची थकबाकी असणाऱ्या ग्राहकांनी आपल्या वीजबिलाचा त्वरित भरणा करुन कारवाई टाळावी. तसेच महावितरणला सहकार्य करावे अन्यथा भविष्यामध्ये मोठी कारवाई करण्यात येणार आहे.
पप्पू पिसाळ
पिंपळगाव शाखा, अभियंता