जुत्रर, (पुणे) : पॉस्को कायाद्याअंतर्गत अटकेत असलेला आळेफाटा पोलिस ठाण्याचा आरोपी जुन्नर येथून बेडीसह फरार झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी जुन्नर पोलीस ठाण्यात अजय तानाजी मुठे (रा. कोथूळ, ता. अकोले, जि. अहमदनगर) याच्याविरुद्ध भादंवि कलम २२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रजासत्तादिनाच्या दिवशी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पॉस्को कायद्याअंतर्गत पोलिस कोठडीत असणाऱ्या आरोपीला आळेफाटा पोलिस ठाण्याचे कर्मचारी त्यांच्या वाहनातून जुन्नर येथील कारागृहात ठेवण्यासाठी शुक्रवारी २६ जानेवारीला घेऊन जात होते. दरम्यान वाहन जुत्रर पोलिस ठाण्याजवळ हाकेच्या अंतरावर आलेले असताना परदेशपुरा येथे आल्यानंतर आरोपीने पोलिसांच्या वाहनाचा दरवाजा उघडून अंधाराचा फायदा घेत बेडीसह पळ काढला.
आळेफाटा पोलिसांनी आरोपीचा पाठलाग केला, मात्र त्याने थांगपत्ता लागू दिला नाही. या घटनेमुळे आळेफाटा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. तसेच पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. याबाबत आळेफाटाचे पोलिस अमलदार भुजंग नारायण सुकाळे यांनी जुन्नर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुन्नरचे सहायक फौजदार भगवंत गिजरे यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर पोलिस अधिक तपास करत आहेत