शिवनेरी : शिवनेरी गडाच्या पायथ्याशी एक धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. आज शिवनेरीच्या पहिल्या पायरीला अभिवादन करून अमोल कोल्हे आणि जयंत पाटील यांनी शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात केली. जयंत पाटील आणि अमोल कोल्हे हे शिवनेरीला शेकडो कार्यकर्त्यांसह उपस्थित होते. दरम्यान येथे एक विचित्र घटना घडली. अमोल कोल्हे आणि जयंत पाटील ज्या क्रेनच्या ट्रॉलीवर उभे होते, तीचा अचानक एका बाजूला तोल गेला.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार अमोल कोल्हे या अपघातात थोडक्यात बचावले आहेत. शिवस्वराज्याची यात्रा सुरू झाली आहे. यावेळी शिवनेरीच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातल्यानंतर क्रेनची ट्रॉली एका बाजूला सरकली.
यावेळी क्रेनच्या ट्रॉलीत जयंत पाटील, अमोल कोल्हे, मेहबुब शेख, रोहिणी खडसे होत्या. चौघेही एका बाजूला कलंडले. सुदैवाने यात कोणाला दुखापत झाली नसून सर्व जण सुखरुप आहेत. छत्रपती शिवरायांचा पुतळा उंचावर असल्याने क्रेनच्या सहाय्याने हे नेते उंचावर चढले होते. दरम्यान क्रेनमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला आणि त्याची ट्रॉली एका बाजूने कलंडली.
जयंत पाटील म्हणाले..
आमची यात्रा ही साधी असून यात आमचा कोणता ही इव्हेंट नाही. जनतेच्या मनातील प्रश्न आम्ही मांडतोय, त्यासाठी कोणता विशिष्ट रंग देण्याची गरज नाही. त्यामुळं आमच्या यात्रेला जनसामान्यांचा पाठिंबा मिळतोय अशा शब्दात अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेवर जयंत पाटलांनी टिका केली आहे.
उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यानंतर तेच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असतील, अशी चर्चा होत आहे. याबाबत जयंत पाटलांना विचारण्यात आले. उद्धव ठाकरे दिल्लीला जाऊन आले ही बाब मविआच्या दृष्टीने चांगली. एकसंध होऊन आम्ही निवडणुका लढणार, एकत्रित सगळे निर्णय घेणार असल्याची प्रतिक्रिया जयंत पाटलांनी यावेळी दिली.
माजी मंत्री जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, रोहिणी खडसे, मेहबुब शेख क्रेनमधून पडताना थोडक्यात बचावले, थरारक घटनेचा व्हिडिओ @Jayant_R_Patil @kolhe_amol @Rohini_khadse pic.twitter.com/ONhd7HB0Gm
— Yogesh Kangude (@Yogesh_Kangude) August 9, 2024
पुढे त्यांना अजित पवार गटाचे अतुल बेनके तुमच्या पक्षात येण्यास इच्छुक आहेत. याबद्दल विचारण्यात आले. यावर जयंत पाटील म्हणाले कि, अतुल बेनके आमच्या यात्रेत आले तर त्यांचं स्वागतच आहे. पण मी जुन्नरमध्ये आल्यानंतर ते मला अद्याप भेटले नाहीत. ते आमच्या पक्षात येऊ इच्छितात, असं मी ऐकल्याचे जयंत पाटील म्हणाले.