पुणे : आयशर टेम्पोची दुचाकीला धडक बसून ११ वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना चाकण येथील तळेगाव चौकात शनिवारी (ता. २५) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी चाकण पोलिसांनी टेम्पो चालकाला अटक केली आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, समर्थ सुनील लोंढे (वय-११, रा. रिदोरी, ता. माजलगाव, जि. बीड) असे मृत्यू झालेल्या लहान मुलाचे नाव आहे. याप्रकरणी टेम्पो चालक अमोल लक्ष्मण वाघमारे (वय-२३, रा. वाघाळा, राहूल नगर, कौठा, जि. नांदेड) याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याबाबत मृत समर्थ याचे मामा दत्ता सखाराम जगताप (वय-३२, रा. डोंगर वस्ती, निघोजे, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्ता जगताप हे भाचा समर्थ व मुलगी राजनंदनी यांना घेऊन दुचाकीवरुन (एमएच १४ जे.एस. २९४२) चाकण बस स्टँडकडे जात होते. दरम्यान, तळेगाव चौकातील सिग्नल सुटल्यानंतर ते दुचाकीवरून रस्ता ओलांडत असताना, पुणे-नाशिक महामार्गावरून जाणाऱ्या आयशर टेम्पोने (एम.एच. २४ ए.यु. ७२०७) जगताप यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये जगताप यांचा भाचा समर्थ हा टेम्पोखाली आल्याने गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, या अपघातात दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.