राहुलकुमार अवचट
यवत : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाज आरक्षणासाठी केलेल्या मागण्या मान्य करा अन्यथा अखंड मराठा समाज यांच्या वतीने रस्ता रोको, तसेच गाव बंद आंदोलन केले जाईल, असा इशारा दौंड तालुका यांच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन नायब तहसीलदार तुषार बोरकर यांना देण्यात आले आहे.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नांबाबत मनोज जरांगे पाटलांचे उपोषण सरकारने घेऊन पुढाकार त्वरित सोडवण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आले आहे. अखंड मराठा समाजाच्या वतीने गरजवंत मराठ्यांच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे गेल्या एक वर्षभरापासून आंदोलन करत असून आता पर्यंत सहा वेळा आमरण उपोषण केले आहे.
सध्या सुरू असलेल्या उपोषणादरम्यान मनोज जरांगे पाटील यांची खालावत चाललेली परिस्थिती पाहता व त्यांच्या आरोग्याचा विचार करता त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे अखंड मराठा समाजाची परीक्षा न पाहता सरकारने स्वतः पुढाकार घेऊन सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी. हैदराबाद, सातारा व बॉम्बे गव्हर्मेट गॅझेट लागू करावे. संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा बांधवांवर झालेले गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावेत.
कुणबी नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र द्यावे. शिंदे समितीने नोंदी शोधण्याचे काम गतीने सुरु करावे. ईडब्ल्यूएस (EWS) सह एसईबीसी (SEBC) किंवा कुणबी हा पर्याय तात्काळ अंमलात आणावा. मराठा आणि कुणबी एकच असल्याचा अध्यादेश शासनाने काढावा. यासाठी सरकारने विशेष अधिवेशन बोलावून तात्काळ मागण्या मान्य कराव्यात जेणेकरून विरोधी पक्षाची भूमिका देखील समाजाला कळेल.
मराठा आरक्षण प्रश्नासाठी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसून ४ दिवस झाले असून त्यांची तब्येत खालावत चाललेली आहे. तरी सरकारने काहीही हालचाली सुरु केलेल्या दिसून येत नसल्याने शासनाने त्वरित विशेष अधिवेशन बोलवावे व मनोज सारंगी पाटील यांच्या मागण्या आणि आरक्षण देऊन हा प्रश्न कायम स्वरूपीचा निकालात काढावा, अन्यथा राष्ट्रीय महामार्ग रोको, रेल्वे रोको, सत्ताधारी व विरोधी पक्षातील नेत्यांना सरसकट गाव बंदी, नेत्यांना घेराव, शासकीय कार्यालयातील काम बंद आंदोलन, मराठा समाजातील मुले शाळा, कॉलेजवरती बहिष्कार टाकतील.
तसेच मंत्रालयावर घंटा नाद, पायी यात्रा काढण्यात येणार व जोपर्यंत आरक्षणाची दखल घेण्यात येत नाही तोपर्यंत मंत्रालयाला घेराव आणि कामबंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी राजाभाऊ तांबे, गणेश दिवेकर, विकास माने, विकास शितोळे, सुरेश तळेकर, प्रशांत ताडगे, योगेश कुल यांसह अखंड मराठा समाज दौंड तालुका यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.