इम्रान अत्तार

भोर: भोर तालुक्यातील महुडे खोऱ्यात मंगळवारी (Bhor News) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) केलेल्या धडक कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली. शिंद व गवडी (Bribe News) गावांचे ग्रामसेवक महादेव नामदेव सालगुडे (रा. बारामती) यांना घरकुल योजनेचा दुसरा हप्ता मंजूर करून देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तक्रारदार हे शासनाच्या घरकुल योजनेचे लाभार्थी आहेत. घरकुलाच्या दुसऱ्या हप्त्याची रक्कम मंजूर करून देण्यासाठी ग्रामसेवक महादेव सालगुडे यांनी तक्रारदाराकडे १५ हजार रुपयांची मागणी केल्याचे समोर आले. शासकीय कामासाठी लाचेची मागणी होत असल्याने तक्रारदाराने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

तक्रारीची प्राथमिक पडताळणी करण्यात आल्यानंतर एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला. मंगळवारी भोलावडे – शिंद मार्गावर ठरलेल्या ठिकाणी तक्रारदाराकडून १५ हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना ग्रामसेवक सालगुडे यांना अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. कारवाईनंतर परिसरात मोठी चर्चा सुरू झाली असून अनेक नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे.
घरकुलासारख्या सर्वसामान्य आणि गरजू नागरिकांसाठी असलेल्या योजनांमध्ये लाचेची मागणी होत असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. शासनाच्या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी नागरिकांना आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही समोर आल्या होत्या. एसीबीच्या या कारवाईमुळे तालुक्यातील शासकीय कार्यालयांमध्येही एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी भोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात येत आहे.







