यवत: राहु येथील युवा शेतकरी निलेश कुल यांनी प्रचंड मेहनत करत जिद्द व चिकाटीच्या जोरावर खडकाळ माळरानावर एकरी १२० टन उसाचे उत्पादन घेऊन मजल मारली आहे. कुल यांनी अडीच एकर क्षेत्रात २८२ टन ऊस उत्पादन घेतले आहे. माध्यमिक शाळा सोडल्यानंतर निलेश यांनी नोकरीच्या मागे न लागता घरच्या शेतीकडे लक्ष दिले. उसाचे एकरी उत्पादन घेण्यात त्यांनी परीसरात विक्रम नोंदविला असून त्यांचे शेतकरी वर्गात कौतुक होत आहे.
एकरी १४० टन उत्पादन घेण्यासाठी निलेश यांनी काय केले?
विशेष म्हणजे, यावरच न थांबता आता एकरी १४० टन उत्पादन घेण्यासाठी निलेश याने कंबर कसली असून शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली तर नोकरदारांपेक्षाही अधिक उत्पन्न मिळविता येते, याची प्रचिती निलेश यांनी दिली आहे. फेब्रुवारी महिन्यात ट्रॅक्टरच्या एक फाळी पलटीच्या साहाय्याने नांगरट केली. मे महिन्यात ५ ट्रॉली शेणखत व १५ टन कंपोस्ट खत टाकून नांगरट केली. साडेचारफुटी सरी काढत दीड फूट अंतरावर को ८६०३२ जातीच्या उसाची एक डोळा पद्धतीने लागवड करून पुन्हा पाणी दिले.
तीन महिन्यांनंतर भरणी केली. यासाठी रासायनिक खतांचे सहा ढोस दिले, तर जीवाणू खते, किटकनाशके, बुरशीनाशके, सूक्ष्म अन्नद्रव्ये, संजीवके फवारून आळवण्या घेतल्या. यासाठी निलेश यांना खंडेराव चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले आहे.