राहुलकुमार अवचट
यवत : दौंड तालुक्यातील भरतगाव येथील हाकेवाडी येथे अवकाळी पावसामुळे घराची भिंत कोसळून ३ मेंढ्यांचा मृत्यू झाला, तर १० मेंढ्या जखमी झाल्याची घटना घडली आहे. मेंढपाळ सिधू कोंडीबा हाके हे चार खंडी मेंढ्या चारण्यासाठी घेऊन फिरत होते. त्यावेळी अचानक वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस सुरुवात झाली.
त्यामुळे मेंढ्यांचा कळप घराच्या आडोशाला जाऊन थांबला असता घराची दगडी भिंत मेंढ्यांच्या कळपावर कोसळली. त्यामध्ये तीन मेंढ्या जागीच ठार झाल्या, तर ८ ते १० मेंढ्या जखमी झाल्या आहेत. त्यापैकी पाच ते सहा मेंढ्यांचे पाय मोडले आहेत, अशी माहिती माजी सरपंच सावळाराम हाके यांनी दिली.
सदर घटनेची दखल घेऊन पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी डॉ. अजित पवार यांनी घटनास्थळी भेट देवून मृत्यू झालेल्या मेंढ्यांचे शवविच्छेदन करून जखमी असलेल्या मेंढ्यांना औषध उपचार केले. सिधू कोळपे या मेंढपाळाच्या कळपातील तीन मेंढ्याचा मृत्यू झाल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच भरतगाव हाकेवाडी येथील माजी सरपंच सावळाराम हाके यांची कांदा वखार वादळीवाऱ्यात खाली पडल्याचे देखील यावेळी त्यांनी सांगितले.
वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊस
यवत, खुटबाव, कासुर्डी फाटा, भरतगाव हाकेवाडी या भागात वादळीवाऱ्यासह जोरदार पाऊसाने हजेरी लावली. यामध्ये विजेचे खांब तसेच मोठ-मोठे झाडे कोसळले. त्यामुळे रविवारी रात्री उशिरापर्यंत यवत गावठाण परिसरातील वीज बंद होती.