लोणीकंद (पुणे) : लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडगाव शिंदे परिसरात गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाच्या (Social Security Department) पथकाने छापा टाकला आहे. छापा टाकून सुमारे १ कोटी ६ लाख रुपयांचे रसायन व दारू जप्त केली आहे. या प्रकरणी तीन जणांवर लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अशोक गोवर्धन सोलंकी ( वय ४४ वर्षे ), अरुण रमेश कुवरीया, संजय जगन्नाथ कुवरीया ( तिघेही रा. वडगाव शिंदे ता. हवेली, जि.पुणे ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. या प्रकरणी सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलिस हवालदार तुषार नामदेव मिवरकर यांनी फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडगाव शिंदे येथे अशोक सोलंकी अरुण कुवरीया, संजय कुवरीया हे गावठी हातभट्टीची दारू तयार करीत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला मिळाली होती.
वडगाव शिंदे येथील हातभट्टी वर छापा टाकल्यानंतर त्या ठिकाणी 1 कोटी 5 लाख रुपये किमतीचे २ लाख १० हजार लीटर हातभट्टी दारु तयार करण्यासाठी लागणारे रसायन, एक लाख 80 हजार रुपये किमतीची १५०० लिटर हातभट्टी गावठी दारु, ते तयार करण्यासाठी लागणारे 15 हजार रुपये किमतीचे साहित्य. असा सुमारे 1 कोटी 6 लाख 95 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तपास लोणीकंद पोलीस करीत आहेत.