पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सूरु झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. अशातच मावळ विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये मिठाचा खडा पडला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांच्याविरोधात आता भाजप नेत्यांनीच मोर्चेबांधणी सुरु केली असल्याचे चित्र आहे. कारण बापू भेगडे यांच्या पाठोपाठ आता भाजपचे रवींद्र भेगडे निवडणूक लढण्यावर ठाम आहेत, मी लढणार आहे असे त्यांनी जाहीर सुद्धा केले आहे. त्यामुळे मावळमध्ये भाजप विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी असा सामना पाहायला मिळणार आहे.
मावळवरुन महायुतीत रस्सीखेच..
अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. कारण बापू भेगडे यांच्या पाठोपाठ आता भाजपचे रवींद्र भेगडे निवडणूक लढण्यावर ठाम असून रवींद्र भेगडे यांनी भारतीय जनता पार्टीने दिलेल समन्वयक पदही नाकारले आहे. तसेच आम्ही निवडणूक लढणार आहे. उमेदवाराची अधिकृत घोषणा होत नाही, तोपर्यंत आम्ही आमच्या निर्णयावर ठाम आहोत, असे म्हणत कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.
मावळ विधानसभेसाठी आमचा प्रचार सुरू आहे. आता आमची सर्व तयारी झालेली आहे. इथली जनता त्रासलेली आहे. महायुतीपेक्षा आम्हाला तालुका प्रिय असून पाच वर्षातील राजकारण आहे. ते जनतेला नको झालं आहे. मावळ विधानसभेत परिवर्तन अटळ आहे. मावळ विधानसभेत आमचं ठरलं आहे. अधिकृत उमेदवारी जाहीर होऊ द्या. मावळमध्ये परिवर्तन अटळ आहे, असेही रवींद्र भेगडे यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता मावळात महायुतीमध्येच संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.