खेड शिवापूर, (पुणे) : राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या खेड शिवापूर पोलीस चौकीमध्ये एका पोलीस हवालदारावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. शिवीगाळ करत एका व्यक्तीने पोलीस कार्यालयात घुसून पोलीस अंमलदाराला डोक्यामध्ये खुर्ची फेकून मारुन गंभीर जखमी केले. तसेच कार्यालयाची तोडफोड करुन 50 हजार रुपयांचे नुकसान केले. ही घटना रविवारी (दि.15 रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमरास घडली.(
याप्रकरणी पोलीस हवालदार राहुल बाळकृष्ण कोल्हे (वय-39) यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून रोहन गौतम साळवे (रा. कल्याण, ता. हवेली, जि. पुणे) याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पोलीस हवालदार राहुल कोल्हे हे राजगड पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खेड शिवापूर दूरक्षेत्र हवेली तालुक्यातील श्रीरामनगर येथे नेमणुकीस आहेत. पोलिस चौकीमध्ये रविवारी रात्री कोल्हे हे कर्तव्यावर काम करत असताना रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास आरोपी रोहन अनधिकृतरीत्या पोलिस चौकीमध्ये आला.
रोहन याने फिर्य़ाद यांना शिवीगाळ करत कार्यालयातील खुर्ची संगणकावर मारली. आरोपीने संगणक आणि इतर सरकारी मालमत्तेची तोडफोड करुन 50 हजार रुपयांचे नुकसान केले. त्यानंतर रोहन याने कोल्हे यांना खुर्ची फेकून मारत गंभीर जखमी केले. या घटनेनंतर सदर आरोपी फरार झाला असून राजगड पोलीस तपास करत आहेत.