दौंड : दौंड तालुक्यातील जिरेगाव येथील एका विवाहित महिलेने सासू आणि नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. योगिनी संतोष जाधव (वय-19 , जाधववस्ती, जिरेगांव, ता. दौंड, जि. पुणे ) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सुभाष आनंदराव चव्हाण यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पती संतोष बबन जाधव आणि सासू मंगल बबन जाधव (दोघेही रा. जिरेगांव, ता. दौंड, जि. पुणे ) यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगीनी हिचे संतोष जाधव याच्यासोबत ६ डिसेंबर २०२३ रोजी लग्न झाले होते. लग्नानंतर सासु आणि नवरा तुला स्वयंपाक, घरातील कामे करता येत नाही, तु माहेरी सारखे फोन करते, तसेच तुझे बाळंतपणासाठी तू तुझ्या वडीलांकडून पैसे घे, असे म्हणत वारंवार मानसिक त्रास देत शिवीगाळ करुन मारहाण करत होते.
या त्रासाला कंटाळून ती गरोदर असताना १२ एप्रिल रोजी घरातून निघून गेली होती. याबाबत तिचे पती संतोष याने दौंड पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. तेव्हांपासून योगीनी बेपत्ता होती.
दरम्यान, योगीनीचा मृतदेह रविवारी 2 जून रोजी जिरेगाव येथील झाडाझुडपात गळपास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला, असं योगिनी हिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.