उरुळी कांचन, (पुणे) : टिळेकरवाडी (ता. हवेली) येथे ‘ज्युस’ घेऊन येते असे सांगून घराबाहेर पडलेल्या एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी चुलत चुलत भावावर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मुलीच्या आईने उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नात्यातीलच चुलत चुलत भाऊ लिंगेष गोरखनाथ सोनकांबळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे टिळेकरवाडी परिसरात शेतात मजुरीचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हे दांपत्य शेतात काम करत असताना, त्यांच्या लहान मुलीने फोन करून सांगितले की, मोठी बहीण ही दुपारी एक वाजता ज्युस आणायला जाते असे सांगून घरातून निघून गेली आहे, मात्र ती अजून परतली नाही.

त्यानंतर आई-वडिलांनी तात्काळ घर गाठून मुलीचा टिळेकरवाडी, खामगाव टेक, उरुळी कांचन गाव व नातेवाईकांकडे शोध घेतला, मात्र ती कुठेही मिळून आली नाही. दरम्यान, त्याच रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास मुलीच्या आईच्या मोबाईलवर एका अज्ञात नंबरवरून इंग्रजीत ‘Sorry Mummy’ असा मॅसेज आला.
दरम्यान, आईने आणि कुटुंबीयांनी त्या मोबाईल नंबरची खात्री केली असता, सदर नंबर हा त्यांच्याच नात्यातील चुलत भाऊ लिंगेष सोनकांबळे याचा असल्याचे निष्पन्न झाले. लिंगेष यानेच कशाचे तरी आमिष दाखवून, फुस लावून पळवून नेल्याचा संशय मुलीच्या आईने व्यक्त केला आहे. अल्पवयीन मुलीला तिच्या कायदेशीर पालकांच्या संमतीशिवाय पळवून नेल्याप्रकरणी उरुळी कांचन पोलिसांनी या प्रकरणाची कडक दखल घेतली आहे. तपास पोलीस सहायक फौजदार मत्रे करत आहेत.







