पुणे: दौंड तालुक्यातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी महत्त्वाची ठरणारी घडामोड घडली आहे. पाटस (ता. दौंड, जि. पुणे) येथील गट क्रमांक ८९० मधील १० एकर शासकीय गायरान जमीन कृषी उत्पन्न बाजार समिती, दौंड यांना बाजार आवार उभारण्यासाठी मंजूर करण्यात आली आहे. या निर्णयामुळे पाटस आणि परिसरातील शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

महसूल व वन विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला असून, ही जमीन नाममात्र १ रुपया दराने कब्जेहक्काने देण्यास पूर्वमंजुरी देण्यात आली आहे. तसेच ही जमीन पणन संचालक, पुणे यांच्या नावे ‘भोगवटादार वर्ग-२’ या स्वरूपात मंजूर करण्यात आली आहे.

या प्रस्तावासाठी आमदार अॅड. राहुल कुल यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. पाटस परिसरात आधुनिक बाजार आवार उभारून शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी हक्काची जागा आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी शासनाकडे केली होती. या पाठपुराव्यानंतर शासनाने बाजार आवारासाठी जमीन मंजूर करण्याचा निर्णय घेतला.
शासनाने घालून दिलेल्या अटींनुसार या जागेवर पुढील तीन वर्षांच्या आत बाजार आवाराचे काम सुरू करणे बंधनकारक राहणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाची अंमलबजावणी निश्चित कालावधीत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या निर्णयामुळे पाटस आणि परिसरातील शेतकरी व व्यापाऱ्यांना आधुनिक बाजार व्यवस्था उपलब्ध होण्यास मदत होणार असून, शेतमालाच्या खरेदी-विक्रीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. बाजार आवार सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांना माल विक्रीसाठी अधिक सोयीस्कर व्यवस्था मिळेल आणि स्थानिक कृषी अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळेल.
या निर्णयाबाबत आमदार अॅड. राहुल कुल यांनी समाधान व्यक्त करत, पाटस परिसरातील शेतकऱ्यांसाठी हे बाजार आवार महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. शेतमालाला योग्य बाजारपेठ उपलब्ध होऊन व्यापाराला चालना मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.






