इंदापूर, (पुणे) : भिगवण-राशीन राज्यमार्गावर रस्त्यात बिघाड झाल्याने मध्यभागी उभ्या असलेल्या एका मालवाहतूक ट्रकला दुचाकी चालकाने पाठीमागून दिलेल्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता. 05) मध्यरात्री घडली. जॅकी उस्मान काळे (वय 32, रा. डिकसळ, ता. इंदापूर, जि. पुणे) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुर्दैवी युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत जॅकी काळे हे रविवारी त्यांच्या दुचाकीवरून राशीनहून भिगवणच्या दिशेने जात होते. ते डिकसळ गावच्या हद्दीत आले असता, रस्त्याच्या मध्यभागी एक मालवाहतूक ट्रक (क्रमांक MH 12 SX 1342) उभा होता. या ट्रकमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने तो चालकाने थेट चालू रस्त्यावरच उभा करून ठेवला होता.

रात्रीच्या अंधारात किंवा रस्त्यावरील वाहनांच्या अंदाजामुळे जॅकी काळे यांना रस्त्याच्या मध्यभागी उभा असलेला हा ट्रक वेळेत दिसला नाही. परिणामी, त्यांच्या दुचाकीची या बिघाडग्रस्त ट्रकच्या पाठीमागील बाजूला प्रचंड जोरात धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीचा पुढचा भाग चक्काचूर झाला आणि गंभीर दुखापत झाल्याने जॅकी काळे यांचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, अपघातानंतर बिघाडग्रस्त ट्रक बराच वेळ रस्त्याच्या मध्यभागी उभा असल्यानेच हा अपघात घडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तसेच घटनास्थळापासून काही अंतरावरच पोलिसांची तपासणी चौकी असतानाही ट्रक वेळेत हटविण्यात आला नसल्याची चर्चा परिसरात होती. या घटनेची माहिती मिळताच भिगवण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास भिगवण पोलीस करत आहेत.






