पुणे: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातून पुन्हा एकदा एक संतापजनक घटना समोर आली आहे. शाळेतून घरी परतणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पीडित मुलीने दाखवलेल्या प्रचंड धैर्यामुळे ती नराधमाच्या तावडीतून स्वतःचा जीव वाचवून सुखरूप बाहेर पडली. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र रोष व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी शाळा सुटल्यानंतर घरी जात होती. वाटेत आरोपीने तिला गाठले आणि “तुझे वडील घरात बोलावतायत,” अशी खोटी बतावणी करून तिला एका घरात नेले. मुलगी घरात शिरताच आरोपीने बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. अशा कठीण प्रसंगात घाबरून न जाता, तिने शिताफीने पाणी पिण्याचा बहाणा केला. आरोपीचे लक्ष भरकटताच, ती घराच्या मागील दरवाजातून निर्वस्त्रावस्थेत घराबाहेर पडली. दरम्यान, निर्वस्त्र रस्त्यावर धावत असल्याचे पाहून लोकांनी तिला तातडीने कपडे दिले.

या गंभीर घटनेची माहिती मिळताच भोर पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (POCSO) गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा करून आरोपी फरार झाला होता, मात्र भोर पोलिसांनी तांत्रिक तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलीस निरीक्षक निलेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अवघ्या 36 तासांच्या आत सातारा येथून आरोपीला अटक केली.







