योगेश शेंडगे
शिरूर : शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे, विठ्ठलवाडी, निमगाव म्हाळुंगी, पारोडी, दहिवडी, इंगळे नगर या गावांमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्याचा वावर लक्षणीय वाढला आहे. बिबट्याने छोटे-मोठे हल्ले करून अनेक प्राण्यांवर हल्ला करून त्यांना जेरबंद केले आहे. या घटना ताज्या असतानाच तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायतीतील जगतापवस्ती येथे बिबट्याने पाळीव कुत्र्यावर हल्ला केल्याची घटना बुधवार (०७) रात्री १०:३० च्या सुमारास घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
या घटनेच्या आधी बिबट्या रात्री ८ वाजता किरण रामदास ढमढेरे यांना दिसला होता त्यांनी सर्वांना सावध केले होते. त्यानंतर काही वेळाने बिबट्याने प्रमोद किशोर भुजबळ (रा.जगताप वस्ती ,तळेगाव ढमढेरे)यांच्या पाळीव कुत्र्यावर घराच्या ओट्यावर येऊन हल्ला केला. ओट्यावर आवाज आल्याने त्यांनी बाहेर धाव घेतली असता बिबट्या कुत्र्यावर हल्ला करत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी मोठ्याने आरडा ओरडा केल्याने बिबट्याने तेथून गवतामधे पळ काढला. या घटनेत त्यांचा कुत्रा गंभीर जखमी झाला. या घटनेने वस्तीत राहणारे नागरिक भयभीत झाले आहेत.
सदर घटनेच्या दुसऱ्या रात्री सुद्धा पुन्हा बिबट्याचे दर्शन झाले. मात्र त्याला पकडण्यासाठी वनविभागाने अद्याप कोणतीही उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे वनविभागाच्या दुर्लक्षामुळे सर्वसामान्य नागरिकांचा जीव महागणार का? असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे. मानवी वस्तीत बिबट्या शिरूनही वनविभाग कारवाईचे गांभीर्य दाखवत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
परिसरात बिबट्यांचा वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मेंढपाळ व मेंढपाळांना त्यांची जनावरे चरायला नेणे कठीण झाले आहे. तसेच बिबट्याच्या भीतीने रात्री पिकांना पाणी देणे अशक्य असल्याने पाणी असूनही पिकांना पाणी देता येत नाही. शेतमजूर भीतीपोटी कामाला बाहेर पडत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. यासोबतच स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बिबट्याला जेरबंद करण्याबाबत वनविभाग गंभीर नसल्याने वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांचे बळी जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या घटनेबाबत किरण ढमढेरे यांनी वन विभागाकडे संपर्क साधला असता वन विभागाकडून काळजी घ्या, एकटे घराच्या बाहेर पडू नका, लहान मुलांना सांभाळा, जर घराबाहेर पडले तर बॅटरी व काठी हातात असू द्या असे सांगण्यात आले. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केल्यावर, एकच पिंजरा उपलब्ध आहे तो आपण कोठे कोठे लावणार असे सांगण्यात आले.