अरुण भोई
खानवटे, (दौंड) : दौंड येथे भिगवण-राशीन रस्त्यालगत असलेल्या सिद्धार्थ शिलवंत यांच्या शेतातील विहिरीत गेल्या दोन दिवसांपासून पडलेल्या कोल्ह्याची अखेर सुटका करण्यात वन विभागाला यश आलं आहे.
शिलवंत यांच्या शेतात एक विहीर आहे. भक्ष्याच्या पाठलागावर धावणारा कोल्हा या विहिरीत अचानक कोसळला. विहीर ४० फुट खोल असल्याने त्याला उडी मारूनही बाहेर पडता येईना. त्यामुळे तो ओरडू लागला. त्याच्या आवाजाने शेतात गेलेले शिलवंत हे विहिरीजवळ आले. त्यांनी गावातील पोलीस पाटील यांचे पती उत्तमराव गायकवाड यांना फोनवरून माहिती दिली.
त्यांनी त्वरित दौंडचे वनपरिक्षेत्र अधिकारी आणि वनरक्षक निखिल गुंड यांना माहिती दिली. यानंतर वनविभागाचे रेस्क्यू पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत त्यांनी त्वरित सुटकेचे प्रयत्न सुरू केले. अखेर वनविभागाला अथक प्रयत्नानंतर कोल्ह्याला विहिरीतून बाहेर काढण्यात यश आलं.
या ठिकाणी वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांचे मार्गदर्शनाखाली वनरक्षक निखिल गुंड, रेस्क्यू टिमचे श्रेयस कांबळे, नचिकेत अवढणी, प्रशांत कौलकर, ऋषी मोरे, पोलीस पाटील खानवटे, उत्तमराव गायकवाड, अनिल ढवळे, सिद्धार्थ शिलवंत, खानवटे गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.