यवत, (पुणे) : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या व कायम गजबजलेल्या पाटस (ता. दौंड) परिसरात दोन गटांतील वाद थेट गोळीबारात रूपांतरीत झाला. काष्टी (ता. श्रीगोंदा) आणि पाटस येथील गुंड प्रवृत्तीच्या तरुणांमध्ये झालेल्या या टोळीयुद्धात गावठी पिस्तूलमधून तब्बल 3 राऊंड फायर करण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण दौंड तालुका हादरला असून पाटस परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. (Daund News)

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शुक्रवारी (ता. 05) दुपारी पाटस येथील मुख्य बाजारपेठेचा भाग असलेल्या गडदरे कॉम्प्लेक्ससमोर काष्टी येथील काही गुंड प्रवृत्तीचे तरुण आले होते. तिथे त्यांचा पाटस येथील काही तरुणांशी कोणत्यातरी कारणावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की दोन्ही गट रस्त्यावर एकमेकांना भिडले आणि त्यांनी एकमेकांवर जोरदार दगडफेक सुरू केली.
तितक्यात दोन्ही बाजूच्या गुंडांनी कमरेला लावलेले गावठी पिस्तूल (कट्टा) बाहेर काढले आणि हवेत तसेच समोरासमोर थेट गोळ्या झाडल्या. भरबाजारपेठेत 3 राऊंड फायर झाल्याने परिसरात एकच पळापळ आणि घबराट उडाली. सुदैवाने या गोळीबारात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
गोळीबाराचा आवाज आणि घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख आणि पाटस चौकीचे पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांची गाडी पाहताच गोळीबार करणारे आरोपी दुचाकी सोडून पळू लागले. यातील काही मुख्य आरोपी शेजारीच असलेल्या उसाच्या दाट शेतात घुसले.
पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी तात्काळ कडक पावले उचलत यवत पोलिसांच्या फौजफाट्यासह संपूर्ण उसाच्या क्षेत्राला वेढा (गराडा) घातला. भर उन्हात पोलिसांनी जीवाची बाजी लावून उसाच्या शेतात थरारक पाठलाग करत 3 सराईत आरोपींना रंगेहात पकडण्यात यश मिळवले आहे. तर उर्वरित फरार आरोपींचा माग काढण्यासाठी उसाच्या शेतात पोलिसांचे मोठे सर्च आणि कॉम्बिंग ऑपरेशन सुरू आहे.
पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता, तिथून गोळीबाराच्या पुंगळ्या (रिकामी काडतुसे) जप्त करण्यात आल्या आहेत. या घटनेनंतर पाटस परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. हा गोळीबार नेमका जुन्या वैमनस्यातून झाला की कोणत्या आर्थिक देवाणघेवाणीतून, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि परिसरात शांतता राखावी.”असे आवाहन पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी केले आहे.







