शिरूर : दाखल गुन्ह्यात अटक न करण्यासाठी तसेच गुन्ह्यात मदत करण्यासाठी १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यातील पोलीस उप निरीक्षकासह व खाजगी इसमावर लाचेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई टाकळी हाजी पोलीस चौकी (ता. शिरूर) येथे गुरुवारी (ता.२४) केली आहे.
माणिक बाळासाहेब मांडगे (पद- पोलीस उपनिरीक्षक, शिरुर पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण. (वर्ग-३) व खाजगी इसम सुभाष मुंजाळ (रा. कवठे यमाई, ता. शिरूर, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी एका 50 वर्षीय महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या मुलाच्या विरुद्ध शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यामध्ये अटक न करण्यासाठी तसेच त्याला गुन्ह्यात मदत करण्यासाठी लोकसेवक माणिक मांडगे यांनी तक्रारदार यांचेकडे २५ हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
मिळालेल्या तक्रारीची पडताळणी केली असता, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला लोकसेवक पोलीस उपनिरीक्षक माणिक मांडगे यांनी तक्रारदार यांच्या मुलावर दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी आणि गुन्ह्यात मदत करण्यासाठी खाजगी इसम सुभाष मुंजाळ याच्याशी बोलण्यास सांगितले होते. तेव्हा सुभाष मुंजाळ यांनी तक्रारदार यांच्याकडे पोलीस उपनिरीक्षक माणिक मांडगे यांच्यासाठी १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. व त्या मागणीस आरोपी लोकसेवक माणिक मांडगे यांनी दुजोरा दिला होता. तसेच आरोपी माणिक मांडगे यांनी सुद्धा १० हजार रुपये लाचेची मागणी करून स्विकारण्याचे मान्य केल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या तपासात निष्पन्न झाले आहे.
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक माणिक मांडगे व खाजगी इसम सुभाष मुंजाळ यांच्याविरोधात शिरूर पोलीस ठाण्यात लाचेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर करीत आहेत. सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.