लोणी काळभोर : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर होंडा आमेज व मारुती सुझुकीच्या अर्टिगा गाडीचा अपघात झाल्याची घटना घडली होती. ही घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन चौकात सोमवारी (ता.14) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली होती. या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली होती, तर दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. या अपघातप्रकरणी आता लोणी काळभोर येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अब्दुलसत्तार बाबुसाहब गोडीकेट (वय, 52, गट गट नं 294, लोणी स्टेशन, मोरया पार्क शेजारी, लोणी काळभोर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चालकाचे नाव आहे. याप्रकरणी रामदास किसन राऊत (वय ४०, वर्ष, वृंदावन कॉलोनी, आझाद नगर, कोथरुड) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रामदास राऊत व त्यांची आई सुनंदा हे दोघे त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्त मारुती सुझुकी कंपनीच्या अर्टिगा गाडीतून धाराशीवला चालले होते. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना, त्यांची गाडी लोणी स्टेशन चौकात आली. तेव्हा अब्दुलसत्तार गोडीकेट हे सार्वजनिक रोडवर मानवी जिवीतास धोका निर्माण होईल. अशा रितीने हयगयीने, बेदरकारपणे, अविचाराने, व वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करीत गाडी चालवीत होते.
दरम्यान, अब्दुलसत्तार गोडीकेट यांनी राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांना प्राधान्य न देता व वाहनांच्या वेगाचा अंदाज न घेता राष्ट्रीय महामार्गावर येवून अचाकन फिर्यादी रामदास राऊत यांच्या गाडीसमोर आले. त्यामुळे फिर्यादी राऊत यांची कार अब्दुलसत्तार गोडीकेट यांच्या गाडीला धडकिली. या अपघातात फिर्यादी रामदास राऊत यांच्या आई सुनंदा या जखमी झाल्या. सुनंदा यांच्या डोक्यास मार लागला असून त्यांच्या उजवा पाय फ्रॅक्चर झाला आहे.
याप्रकरणी रामदास राऊत यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अब्दुलसत्तार गोडीकेट याच्यावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 281, 125(ब) 324(4) मोटार वाहन कायदा कलम 184,119/177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार योगेश कुंभार करीत आहेत.