लोणी काळभोर, ता. २२ : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील गट क्रमांक ११६ मधील ८१ गुंठे शेतजमिनीच्या वादाने आता गंभीर वळण घेतले असून, तब्बल १११ वर्षांच्या भाडेपट्ट्यावर ताब्यात असलेली जमीन परस्पर विकून विश्वासघात केल्याचा प्रकार समोर आला आहे. एवढेच नव्हे, तर शेतातील ऊस पिकावर ट्रॅक्टर फिरवून संपूर्ण पीक उद्ध्वस्त केल्याचा आरोपही करण्यात आला असून, या प्रकरणी सात जणांविरोधात लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

लोणी काळभोरचे माजी सरपंच योगेश प्रल्हाद काळभोर, त्यांचा मुलगा कार्तिक योगेश काळभोर, मोठा भाऊ आणि पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक शिवदास प्रल्हाद काळभोर, पुतण्या आग्नेय शिवदास काळभोर, आदित्य उमेश काळभोर, त्र्यंबक राऊजी शेळके व ताराबाई आबू जागडे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अलका श्रीहरी जागडे (रा. कोथरूड) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर येथील गट क्रमांक ११६ मधील ८१ गुंठे जमीन ही मूळ मालक त्र्यंबक राऊजी शेळके आणि ताराबाई आबू जागडे यांच्या मालकीची होती. पानशेत धरणाच्या पुनर्वसनातून मिळालेली ही जमीन कै. श्रीहरी तानाजी जागडे यांनी ३ ऑक्टोबर २००३ रोजी दस्त १११ वर्षांसाठी भाडेपट्ट्यावर घेतली होती. यासोबतच संबंधित जमिनीबाबत कधीही रद्द न होणारे कुलमुख्त्यारपत्रही करण्यात आले होते. गेल्या २३ वर्षांपासून जागडे कुटुंब या जमिनीवर शेती करत असून, ऊस पिकाची लागवड करून त्याचे बिल व कागदपत्रेही त्यांच्याकडे असल्याचा दावा करण्यात आला आहे.
२१ मे २०२६ रोजी सकाळी शेतात गेल्यानंतर फिर्यादींना त्यांच्या जमिनीवर लोखंडी फलक लावलेला दिसून आला. या फलकावर आदित्य उमेश काळभोर, कार्तिक योगेश काळभोर आणि आग्नेय शिवदास काळभोर यांच्या मालकी व ताब्याचा दावा करण्यात आला होता. हा प्रकार लक्षात येताच फिर्यादी अलका जागडे यांनी लोणी काळभोर पोलिसांकडे धाव घेतली. त्यावेळी पोलिसांनी दोन्ही पक्षांना दिवाणी न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला दिला होता. मात्र, दुसऱ्याच दिवशी म्हणजे २२ मे रोजी शेतात गेल्यानंतर फिर्यादी अलका जागडे यांना धक्काच बसला. शेतातील उभे असलेले ऊस पीक ट्रॅक्टरने नांगरून पूर्णपणे नष्ट करण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या घटनेमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
मूळ मालकांना भाडेपट्टा आणि कुलमुख्त्यारपत्राची पूर्ण माहिती असतानाही, स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्यांनी तृतीय पक्षाला जमीन विकल्याचा आरोप फिर्यादींनी केला आहे. त्यामुळे हा प्रकार विश्वासघात आणि आर्थिक फसवणुकीचा असल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणी त्र्यंबक राऊजी शेळके, ताराबाई आबू जागडे, आदित्य उमेश काळभोर, कार्तिक योगेश काळभोर, आग्नेय शिवदास काळभोर, योगेश प्रल्हाद काळभोर आणि शिवदास प्रल्हाद काळभोर यांच्याविरोधात फसवणूक, विश्वासघात, बेकायदेशीर प्रवेश आणि पिकाचे नुकसान केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.







