पुणे: महाराष्ट्रातील वाढत्या अमली पदार्थांच्या समस्येविरोधात राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे. ड्रग्सची विक्री, तस्करी आणि संबंधित गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी नागरिकांनी पुढे येऊन माहिती द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केले. तसेच ड्रग्सविषयी माहिती देणाऱ्या व्यक्तींना योग्य बक्षीस दिले जाईल आणि त्यांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

विधानसभेत ड्रग्सच्या वाढत्या समस्येवर चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. “ड्रग्स माफियांचे जाळे उद्ध्वस्त करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. ज्या नागरिकांकडे ड्रग्स विक्री किंवा तस्करीबाबत माहिती असेल त्यांनी ती पोलिसांना द्यावी. माहिती देणाऱ्यांना बक्षीस दिले जाईल आणि त्यांची ओळख 100 टक्के गुप्त ठेवली जाईल,” असे त्यांनी सभागृहात सांगितले.

फडणवीस यांनी यावेळी राज्यातील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या कारवायांची माहितीही दिली. महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही छापेमारी करून ड्रग्स तस्करांविरोधात कारवाई करण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. “ज्या ठिकाणी अमली पदार्थांची विक्री सुरू आहे, ते सर्व अड्डे शोधून नष्ट करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या चर्चेदरम्यान शिवसेना (ठाकरे गट) आमदार सुनील प्रभू यांनीही राज्यातील वाढत्या ड्रग्स समस्येबाबत चिंता व्यक्त केली. “तरुण पिढी या विळख्यात अडकत आहे. ड्रग्स विकणारे आणि सेवन करणारे दोघांवरही कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली.
राज्यातील युवकांना अमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी जनजागृती मोहिमा राबविण्यात येत असून, ड्रग्समुक्त महाराष्ट्रासाठी सर्व यंत्रणा एकत्रितपणे काम करत असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले.







