मोरगाव, (पुणे) : कऱ्हा नदीपात्रात काळखैरेवाडी गावाच्या हद्दीमध्ये वाळू उपसा करण्यासाठीची साधनसामग्री घेऊन वाळू चोरीच्या तयारीत असलेल्या पाच जणांवर सुपा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून हायवा ट्रक, लोखंडी खोरी, घमेली, वाळूची चाळण यासह इतर असा 15 लाखांपेक्षा जास्त मुद्देमाल जप्त करण्यात आला.
काळखैरेवाडी गावच्या हद्दीमध्ये कऱ्हा नदीपात्रात पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी बाळा ऊर्फ देवा ऊर्फ किशोर गुलाब देवकाते (रा. बाबुर्डी, ता. बारामती), सूरज दीपक तांदळे, अक्षय लहू चौगुले, संतोष शीलवंत, सनी गौतम चव्हाण (रा. पिंपळी, ता. बारामती) अशा पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सुपा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी सांगितले की, कऱ्हा नदीपात्रामधून रात्रीच्या वेळी काहीजण गाडी घेऊन वाळूची चोरी करत असल्याची माहिती काही शेतकऱ्यांनी पाटील यांना दिली होती. यापूर्वी चार-पाच वेळा संबंधित ठिकाणावरून वाळूचा उपसा करण्यात आला होता.
शेतकरी व पोलिस यांनी सापळा रचून वाळू चोरी करण्यासाठी येणाऱ्या टोळक्याला ताब्यात घेतले. शेतकऱ्यांनी माहिती दिल्यानंतर वाळू चोरी करण्यासाठी आलेली गाडी पाटील यांनी घटनास्थळी त्वरित भेट देऊन यंत्रसामग्रीसह ताब्यात घेतली. पुढील तपास पोलिस पोलिस शिपाई संदीप लोंढे करत आहेत.