दौंड : येथील परिसरात एका महिलेचा जाता येता पाठलाग करत तिला अडवून, छेडछाड करणा-या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा तरुण एका माजी नगराध्यक्षाच्या अगदी जवळचा आणि विश्वासू कार्यकर्ता आहे. त्याच्यावर दौंड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शांकी जैन (वय-37, रा.नैने चाळ, दौंड) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शांकी जैन हा तरुण त्या महिलेचा चार महिन्यांपासून पाठलाग करीत होता. त्यानंतर मोबाईल वरुन कॉल करुन आणि संदेश पाठवून तिला त्रास देत होता. तसेच तिच्या घराचा दरवाजा वाजवून जैनने ‘मला तू आवडते. तुझ्यासोबत बोलायचे आहे’, असे म्हणत तिच्या मनात लज्जा निर्माण होईल असे गैरवर्तन केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
अशावेळी महिलेने सततच्या त्रासाला कंटाळून दौंड पोलिस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा अधिक तपास दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.
दरम्यान, विनयभंगाचा गुन्हा दाखल असलेल्या संशयित आरोपी शांकी जैन याच्यावर यापूर्वी दौंड पोलीस ठाण्यात मटक्याचे आकडे खेळल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. तसेच जैन हा एका माजी नगराध्यक्षाच्या अगदी जवळचा आणि विश्वासू कार्यकर्ता आहे. तसेच जमिनी खरेदी-विक्री करणे, शेतक-यांची फसवणूक करणे असे प्रकार करीत असल्याची चर्चा दौंड शहरात आणि तालुक्यात आहे.